'कल्याण स्टेशन परिसरात नवीन टॅक्‍सी, रिक्षा ठेवायची कोठे?'

'कल्याण स्टेशन परिसरात नवीन टॅक्‍सी, रिक्षा ठेवायची कोठे?'
'कल्याण स्टेशन परिसरात नवीन टॅक्‍सी, रिक्षा ठेवायची कोठे?'

कल्याण - कल्याण स्टेशन परिसरामध्ये येणाऱ्या वाहनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यात बेशिस्त रिक्षा चालकांच्या रांगा आणि रस्त्यात बसलेल्या फेरीवाल्यांमुळे कल्याणकर त्रस्त झाले आहेत. त्यातच भर म्हणून राज्य शासनाने मागेल त्याला रिक्षा आणि टॅक्‍सीचे परवाने देण्याचे धोरण जाहीर केल्याने रिक्षा संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे स्टेशन परिसरामध्ये चालायला जागा नाही, तर या रिक्षा आणि टॅक्‍सी ठेवायच्या कोठे असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

कल्याण शहराच्या रेल्वे स्थानकाजवळ एसटी डेपो, तहसीलदार कार्यालय, न्यायालय, रेल्वे न्यायालय, मुख्य बाजारपेठ, पालिका मुख्यालय, हॉटेल्स आदी ठिकाणे असल्याने येथे वाहनाची नेहमीच वर्दळ असते. वाहनांच्या पार्किंगसाठी जेवढी जागा आहे ती दिवसेंदिवस कमी पडत आहे. त्यातच बेशिस्त रिक्षा चालकांनी रस्त्यावर तर फेरीवाल्यांनी फुटपाथवर ठाण मांडून ठेवले आहे. त्यामुळे अनेक नागरिक रिक्षा आणि फेरीवाल्यांमधून वाट काढत रेल्वे स्थानक गाठतात. या सर्व प्रकारामुळे येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. या सर्व समस्या दूर करु, अशी घोषणा दोन वर्षांपूर्वी पालिका आयुक्त ई रविंद्रन यांनी केली होती. त्यांनी हे काम करण्याचे प्रयत्नही केले. मात्र राजकीय दबावामुळे त्यांना यश मिळाले नाही. तर तत्कालिन कल्याण प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) नंदकिशोर नाईक यांच्या पथकाने शहरातील मान्यवरांची समिती स्थापन करत एक आराखडा तयार करून पालिकेला पाठवला आहे. मात्र तो लालफीतीमध्ये अडकला आहे. या पार्श्‍वभूमीवर अनेक रिक्षा संघटनाची दादागिरी वाढल्याचे चित्र आहे.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्य शासनाने रिक्षाची संख्या मर्यादित केली होती. त्यानुसार कल्याण आरटीओ कार्यालयांतर्गत येणाऱ्या शहरात कल्याणमध्ये 7 हजार 741, डोंबिवलीमध्ये 6 हजार 902, उल्हासनगर 5 हजार 413, अंबरनाथ 2 हजार 637, बदलापुर 2 हजार 104, टिटवाला 502 मुरबाड ग्रामीण 340, असे एकुन परवाना धारक 25299 रिक्षाची संख्या आहे. यात पेट्रोल 3 हजार 50, सीएनजी 21 हजार 337 तर एलपीजीवर चालणारे 912 रिक्षा धावतात. तर 340 काळ्या पिवळ्या टॅक्‍सी धावतात . हा आकडा अधिकृत असला तरी यापेक्षा जास्त रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. नियमानुसार मीटर न धावणे, गणवेश न घालने, नियम धाब्यावर बसवून रिक्षामध्ये चौथे सीट घेणे, रिक्षामध्ये चालकाचे ओळख पत्र न लावणे, वाढीव भाडे घेणे, भाडे नाकारने या जाचातून प्रवासी वर्गाला वास करावा लागत आहे. मागेल त्याल परवाने देण्याच्या शासनाच्या धोरणामुळे आता असलेल्या संख्येपेक्षा वर्षभरात अंदाजे 20 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक अतिरिक्त रिक्षा आणि टॅक्‍सी रस्त्यावर दिसणार आहेत. या परिस्थितीमुळे स्टेशन परिसरात चक्का जाम होणार हे निश्‍चित आहे. या परिस्थितीतून सुटका होईल का?, असा प्रश्‍न नागरिकांना उपस्थित केला आहे.

मागेल त्याला टॅक्‍सी आणि रिक्षा परवाने देण्याचे धोरण राज्य शासनाने जाहीर केले. त्याबद्दल राज्य शासन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे अभिनंदन. या धोरणामुळे बेकायदा रिक्षा कमी होतील. राहिला प्रश्न स्टेशन परिसराचा. या परिसराचा स्मार्ट सिटीअंतर्गत विकास करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे रीजन रिक्षा टॅक्‍सी महासंघ कोकण विभागाचे अध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com