मोर्चा विधानभवनावर जाणारच ! मोर्चेकऱ्यांचा निर्धार ; सरकार सायनलाच मोर्चा रोखणार ?

ब्रह्मा चट्टे
रविवार, 11 मार्च 2018

नाशिकमधून मंगळवार 6 मार्च निघालेला शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा मुंबईत दाखल झाला  ठाण्यात शनिवारी रात्री घेतलेल्या मुक्कामानंतर किसान लाँग मार्च उद्या, सोमवारी ( 12 मार्च) विधीमंडळावर धडकणार आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढायला परवानगी आहे. 

मुंबई : शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी नाशिकहून निघालेला मोर्चा मुंबईत येऊन धडकला आहे. हजारोंच्या संख्येने मुंबईत दाखल झालेल्या मोर्चाचे स्वागत मुंबईकरांसह भाजप वगळता सर्वच पक्षांनी केले आहे. मोर्चेकऱ्यांनी विधानभवनाला घेराव घालणार असल्याचा निर्धार व्यक्त केला अाहे. मात्र, शेतकरी मोर्चाला सायनमध्येच रोखण्याचा प्रयत्न सरकारच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

नाशिकमधून मंगळवार 6 मार्च निघालेला शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा मुंबईत दाखल झाला. ठाण्यात शनिवारी रात्री घेतलेल्या मुक्कामानंतर किसान लाँग मार्च उद्या, सोमवारी ( 12 मार्च) विधिमंडळावर धडकणार आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढायला परवानगी आहे. 

त्यामुळे मोर्चा विधानभवनावर जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकाच्या पातळीवर मोर्चा सायनलाच रोखण्यात येणार असून, कोणत्याही परिस्थितीत मोर्चा विधान भवनावर जाऊ दिला जाणार नाही. मोर्चेकऱ्यांनी जास्तच हट्ट केला तर पोलिसी बळाचा वापर करत सोमय्या मैदानाहून उद्या निघणारा मोर्चा आझाद मैदानावरच रोखण्यात येणार असल्याचे समजते.

याबाबत, किसान सभेचे नेते व शेतकरी सुकाणू समितीचे समन्वयक डाँ. अजित नवले यांनी सांगितले की, " शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा आहे. आम्हाला सरकारच्या वतीने चर्चेचे निमंत्रण देण्यात आले आहे. लेखी आश्वासनाशिवाय आम्ही माघार घेणार नाही. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत विधानभवनाला घेराव घालणार आहोत'', असा निर्धार नवले यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सरकारच्यावतीने विक्रोळी येथे किसान मोर्चातील शेतकऱ्यांचे स्वागत केले. महाजनांनी मोर्च शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा होईल, असे आश्वासन महाजनांनी मोर्चेकऱ्यांना दिले आहे. गिरिश महाजन यांनी अजित नवले, अशोक ढवळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी शेकापचे जयंत पाटील, कपिल पाटील, जीवा गावित उपस्थित होते.

Web Title: Marathi News Maharashtra News Political News Vidhan Sabha Government