मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ साकारणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मुंबई -  मराठी भाषेतील पहिले विद्यापीठ मुंबईतील वांद्रे येथे उभारण्यात येणार आहे. "ग्रंथाली'ने केलेल्या पाठपुराव्यानंतर मुंबई महापालिकेने वांद्रे बॅंडस्टॅंड येथील जागा या विद्यापीठासाठी देण्याचे मान्य केले आहे. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत विधानभवनात होणाऱ्या कार्यक्रमात त्या संदर्भातील अधिकृत पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते "ग्रंथाली'च्या पदाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे. 

मराठी भाषेसाठीच्या स्वतंत्र विद्यापीठाची मागणी 80 वर्षांपासून होत होती. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरूनही ही मागणी सातत्याने होत होती; मात्र त्या दृष्टीने ठोस पावले उचलली गेली नव्हती. राज्यात शिवसेना-भाजपचे राज्य आल्यानंतर या विद्यापीठासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याची विनंती भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्याकडे केली होती. त्यानंतर आपल्या मतदारसंघात हे विद्यापीठ असावे, या दृष्टीने शेलार यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता. वांद्रे येथे बॅंडस्टॅंड येथील जागा देण्याचे पालिकेने मान्य केले आहे. त्याबाबतचे पत्र मंगळवारी (ता. 27) विधानभवनात होणाऱ्या कार्यक्रमात देण्यात येणार आहे. या विद्यापीठाची रचना कशी असावी, तेथे भाषेसाठी पोषक असलेले कोणते उपक्रम राबवावेत याबाबतचे नियोजन सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

असे असेल विद्यापीठ  
-मराठीतील सर्व ग्रंथ व पुस्तके असतील. 
- परीक्षा, संशोधन, लेखन, प्रोत्साहन असे उपक्रम राबविणार 

अन्य भाषांची विद्यापीठे 
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने आजवर तमीळ (2004), संस्कृत (2005 ), तेलुगू, कन्नड (2008), मल्याळम (2013 ) आणि ओडिशा (2014 ) या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यापैकी तमीळ (1981 ), तेलुगू (1985 ), कन्नड (1991 ), मल्याळम (2012 ) या भाषांची आपापल्या राज्यांत स्वतंत्र विद्यापीठे आहेत. संस्कृत भाषेचीही केंद्रीय, अभिमत आणि खासगी अशी अनेक विद्यापीठे देशाच्या वेगवेगळ्या भागांत आहेत. उर्दू, हिंदी आणि इंग्रजीसह परकी भाषांसाठी केंद्रीय विद्यापीठे आहेत. मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ (1998 ) हैदराबादला आहे. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालय (1997) महाराष्ट्रात वर्धा येथे आहे; मात्र आजवर मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ नव्हते.

Web Title: marathi news marathi university mumbai