धारावीतील पटवा समाज देशभरात पाठवतो राख्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

घाऊक बाजारात सर्वसामान्यांना परवडेल अशा दरातील राख्या तयार होतात. पुढे या राख्यांची किंमत किरकोळ बाजारात वाढते. विशेष म्हणजे, अगदी एका रुपयाची राखीही धारावीच्या राखी गल्लीत आहे. राखीची जास्तीत जास्त किंमत 25 रुपये आहे. या किमतीत राख्या घेण्यासाठी किमान सहा डझन राख्यांची खरेदी करावी लागते.

मुंबई: धारावीतील राखी गल्लीत दर वर्षी लाखो राख्या आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मूळचा उत्तर प्रदेशातील पटवा समाज देशभरात घरोघरी राखी पोहचवतो. हा समाज 40 वर्षे या व्यवसायात आहे. आता त्यांच्या या व्यवसायाचे जाळे धारावीपुरते मर्यादित न राहता कर्जतपासून विरारपर्यंत पसरले आहे. सण एका दिवसाचा असला तरी हे काम वर्षभर चालूच असते. यंदा 'बाहुबली'च्या राख्या मोठ्या संख्येने आल्या आहेत. 

राख्यांचा घाऊक बाजार अशी धारावीची ओळख आहे. पटवा समाजाची दुसरी पिढी आता या व्यवसायात आहे. अनेक कुटुंबांतील व्यक्तींच्या हातांना यामुळे काम मिळाले, असे चंद्रशेखर पटवा यांनी सांगितले. विरारपासून कर्जतपर्यंत जवळपास पाचशे कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. राखी बनवण्यासाठी खूप मेहनत आणि एकाग्रता लागते. डिझाईनमधील बारकावे पाळावे लागतात. मुंबईतीलही जवळपास पाचशे कुटुंबे वर्षभर हे काम करतात. लाखो राख्या धारावीत येतात. येथून त्या देशभरात पाठवतात. धाग्यांच्या व्यवसायात असलेल्या पटवा समाजाचा उत्तर प्रदेशातही मोठा व्यवसाय आहे. 

राखी पौर्णिमेसाठी नव्या राखीचे डिझाईन साधारणपणे नोव्हेंबरमध्ये वितरीत करण्यात येते. त्यानंतर पुढच्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर अशा राख्या तयार करण्यात येतात. यंदा 'बाहुबली'च्या राखीला मोठी मागणी आहे. चित्रपट आणि कार्टुन्सचा प्रभाव राख्यांच्या डिझाईनवर असतो, असे पटवा यांनी सांगितले. छोटा भीम, मिस्टर बीन, अँग्री बर्ड यांसारख्या कार्टुन कॅरॅक्‍टरच्या राख्या यंदाही दिसत आहेत. 

एका रुपयाची राखी 
घाऊक बाजारात सर्वसामान्यांना परवडेल अशा दरातील राख्या तयार होतात. पुढे या राख्यांची किंमत किरकोळ बाजारात वाढते. विशेष म्हणजे, अगदी एका रुपयाची राखीही धारावीच्या राखी गल्लीत आहे. राखीची जास्तीत जास्त किंमत 25 रुपये आहे. या किमतीत राख्या घेण्यासाठी किमान सहा डझन राख्यांची खरेदी करावी लागते. 

'जीएसटी' नकोच 
राखीच्या व्यवसायात कोणत्याही यंत्राचा वापर केला जात नाही. कोणतीही मोठी उलाढाल नसलेला घरोघरी केला जाणारा हा व्यवसाय आहे. त्यामुळे याआधीही यावर 'व्हॅट' लावू नये, अशी मागणी आम्ही केली होती. आताही 'जीएसटी' लागू करू नये, अशी मागणी आम्ही संघटनेमार्फत करणार आहोत, असे पटवा यांनी सांगितले.

Web Title: marathi news marathi website raksha bandhan Baahubali Rakhi