असंतोषामुळेच जीएसटीमध्ये कपात : उद्धव ठाकरे

File photo
File photo

मुंबई : वस्तू व सेवा कराच्या दरात कपात केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन. जनतेच्या असंतोषाची झळ बसल्याने आणि गुजरात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेतला; पण इंधन दरवाढ, महागाई, भारनियमन आहेच. इतके दिवस वसूल केलेला जीएसटी परत करणार का? केंद्र सरकारने जनतेची लक्ष्मी ओरबाडून घेतली. आता दिवाळीत लक्ष्मीपूजन कसे करायचे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर टीका केली. शिवसेनेमुळेच सरकार हलायला लागले, असा दावाही त्यांनी केला. 

शिवसेना भवन येथे शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरे यांनाही चिमटा काढला. जनतेच्या हितासाठी आम्ही सरकारमध्ये आहोत; पण जिथे गरज आहे तेथे शिवसेना जनतेसोबत राहणार, असे सांगत सत्तेतून सध्या बाहेर न पडण्याचे सूतोवाच केले. जनतेच्या असंतोषाच्या झळा सरकारला बसू लागल्या आहेत.

त्यामुळेच जीएसटी कमी करण्याचा निर्णय झाला. यातून व्यापारी खूश झाले असले, तरी जनता आजही नाराज आहे. जीएसटी कमी करणे ही दिवाळीची भेट नाही, तर हा सरकारचा नाइलाज आहे. व्यापाऱ्यांनी एकजुटीने विरोध करून सरकारला झुकवले. ही एकजूट महत्त्वाची आहे. सरकारने जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशाराही त्यांनी दिला. चांगले काम केले तर कौतुक करू; पण जनतेसाठी आंदोलनही करू. आमचा दबाव व्यक्तिगत कारणांसाठी नाही, तर जनतेसाठी असतो, असेही त्यांनी नमूद केले. भारनियमन हे कायमस्वरूपी बंद व्हायला पाहिजे. सर्वत्र सत्ता तुमची आहे. मग कोळसा कमी पडेल हे समजले का नाही, असा सवालही त्यांनी केला.

मंत्रिमंडळात राहून शिवसेनेने अनेक गोष्टी मंजूर करून घेतल्या आहेत. अंगणवाडी सेविकांचा प्रश्‍न सोडवला आहे, असेही त्यांनी नमूद केले, तर रेल्वेच्या पादचारी पुलावरील फेरीवाले हटवण्याचे श्रेयही शिवसेनेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते, असे सांगून त्यांनी राज ठाकरे यांनाही चिमटा काढला. 

मुख्यमंत्र्यांना टोला 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्याबाबत विचारले असता, 'ते आत्मचरित्र पारदर्शक असावे. एखाद्यावर काही शिपंडलं तर ते पवित्र होतं, असा समज झाला असावा. तटकरेंवर केलेले सिंचन गैरव्यवहाराचे आरोप खोटे होते हे मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरून जाहीर करावे, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. 

राणेंनाही टोला 
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून व्यक्तिगत जीवनमरणाचा प्रश्‍न प्रत्येकाने सोडवावा. मला नागरिकांच्या जीवनमरणाच्या प्रश्‍नांची चिंता आहे, असा टोला त्यांनी लगावला; मात्र राणेंच्या मंत्रिमंडळातील प्रवेशानंतर सत्तेतून बाहेर पडण्यावर विचारलेल्या प्रश्‍नाला त्यांनी बगल दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com