कल्याणमधील रस्ते दुरुस्त होईपर्यंत पाठपुरावा करणारच : गणपत गायकवाड

रविंद्र खरात 
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

कल्याण : 'कल्याणच्या पूर्व भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम महापालिकेने उशीरा का होईना, पण सुरू केले आहे. यामुळे नागरिकांना थोडाफार दिलासा मिळेल. मात्र, या भागातील सर्व रस्ते दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत या कामाचा पाठपुरावा करणे मी सोडणार नाही', असे प्रतिपादन कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केले. 

कल्याण पूर्वमधील पूना लिंक रोड, चक्की नाका ते नेवाळी फाटा आणि अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत होता. जागरुक नागरिकांनी सोशल मीडियावरून स्थानिक नगरसेवक आणि पालिकेवर टीकेची झोड उठविली होती. याच कालावधीत आमदार गणपत गायकवाड यांनी पालिका आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेत निवेदन सादर केले होते. अनेकदा पत्र पाठवूनही रस्ते दुरुस्त न झाल्याने गायकवाड यांनी संतापही व्यक्त केला होता. 

दरम्यान, परतीचा पाऊस आणि दिवसा होणारी वाहतूक कोंडी यामुळे रस्ते दुरुस्तीचे काम रात्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. काल रात्रीपासून शुक्रवारी पहाटे पाचपर्यंत कल्याण पूर्व भागातील महत्त्वाचा पूना लिंक रोडवरी खड्डे बुजवून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. यावेळी आमदार गायकवाड, महापौर राजेंद्र देवळेकर, पालिका कार्यकारी अभियंता सुनील जोशी उपस्थित होते. 

यासंदर्भात गायकवाड म्हणाले, "पालिकेत यासंदर्भात अनेकदा पत्रव्यवहार केला होता. पावसाळ्यात आणि पावसाळा संपल्यावर ही कामे होणे अपेक्षित होते. पण ती झाली नसल्याने नागरिकांना आणि वाहन चालकांना त्रास झाला. उशीरा का होईना, काम सुरू केल्याने पालिका आयुक्त आणि अधिकारी वर्गाचे आभार! पण सर्व रस्ते दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत पाठपुरावा सोडणार नाही.''

Web Title: marathi news marathi websites Kalyan News Mumbai News