सरकारची कामे गावागावांत पोचवा : देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

मुंबई : राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला 31 ऑक्‍टोबरला तीन वर्षे पूर्ण होत असून, केंद्र व राज्य सरकारने निर्माण केलेला विश्‍वास व विकासाच्या कामाला जनतेने पाठिंबा दिला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावागावांत, वॉर्डावॉर्डांत जाऊन सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोचवावीत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. 

मुंबई : राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला 31 ऑक्‍टोबरला तीन वर्षे पूर्ण होत असून, केंद्र व राज्य सरकारने निर्माण केलेला विश्‍वास व विकासाच्या कामाला जनतेने पाठिंबा दिला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावागावांत, वॉर्डावॉर्डांत जाऊन सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोचवावीत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. 

भाजपच्या मुंबईतील दादर येथील वसंतस्मृती या कार्यालयात पक्षाच्या राज्यस्तरीय विशेष बैठकीत ते बोलत होते. या वेळी भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार अतुल भातखळकर व डॉ. रामदास आंबटकर, तसेच मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार आणि ठाणे भाजप अध्यक्ष खासदार कपिल पाटील उपस्थित होते. बैठकीला पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, मोर्चे व आघाड्यांचे प्रदेश संयोजक, तसेच जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की गेल्या तीन वर्षांत भाजपला राज्यात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांनी भाजपला स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्‍वास व विकासाचे नवे पर्व देशात सुरू केले. भाजपच्या राज्य सरकारनेही त्याच मार्गाने काम केले आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात विषारी प्रचार केला तरीही सामान्य माणसाने पक्षाबद्दल विश्‍वास व्यक्त केला आहे. 

संपर्क, संवाद, सेवा हा भाजपचा आत्मा आहे. त्यामुळे भाजपचे सरकार तीन वर्षे पूर्ण करत असताना उत्सव साजरा करू नये, तर लोकांशी संपर्क साधावा. सरकारच्या कामांचा हजारो लोकांना लाभ झाला आहे, त्यांच्याशी संवाद साधावा. सरकारने केलेली कामे कार्यकर्त्यांनी लोकांना आवर्जून आणि आत्मविश्‍वासाने सांगावीत, असे फडणवीस यांनी सांगितले. 

सरकारला 31 ऑक्‍टोबर रोजी तीन वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्ताने जिल्हा, तालुका आणि गावांच्या स्तरावर लोकांशी संपर्क साधून सरकारची कामे सांगावीत. लोकांनी भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविला आहे. सरकारची कामे सांगण्यासाठी छोट्या समूहांच्या बैठका आयोजित करून लोकांशी संवाद साधावा. 
- रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

Web Title: marathi news marathi websites Mumbai News BJP Devendra Fadnavis