कल्याणमधील रेल्वे स्थानकांच्या परिसराचा होणार कायापालट 

कल्याणमधील रेल्वे स्थानकांच्या परिसराचा होणार कायापालट 

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकाच्या परिसरात प्रवासी, वाहने आणि फेरीवाले हे एकाच वेळी एकत्र आल्याने मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यामुळे या परिसराला बकालपणा आला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण पूर्व-पश्‍चिम रेल्वे स्थानका लगतच्या परिसराचा चेहरा-मोहराच बदलणार असून यासंदर्भात महापालिका आणि रेल्वे प्रशासनाचे उद्या (ता. 2 नोव्हेंबर) महत्त्वाची बैठक होणार आहे. 

कल्याण पश्‍चिमला रेल्वे स्थानकालगत असलेल्या एसटी डेपो, फुटपाथवरील फेरीवाले, बेशिस्तपणे थांबलेल्या रिक्षांमुळे बकालपणा आला आहे; तर दुसरीकडे पूर्व भागातील नागरिकांनाही रेल्वे स्थानक गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याचा आराखडा पूर्ण झाला असून आता उद्या होणाऱ्या बैठकीत त्यावर चर्चा अपेक्षित आहे. 

असा बदलणार 'लूक'! 
कल्याण पश्‍चिममध्ये एसटी डेपोच्या जागेत भव्य व्यापारी संकुल, बस डेपो आणि पार्किंग प्लाझा व्हावा, असे या आराखड्यात म्हटले आहे. येथे फेरीवाल्यांचे पुनर्वसन होईल, तर एसटी डेपोची जागा विकसित करण्याबाबत एसटी महामंडळाने तत्वत: मान्यता दिल्याने या परिसराचा विकास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी कल्याण पश्‍चिममधील स्कायवॉकचा काही भाग तोडून तेथे सॅटिस बनविण्यात येणार आहे. महात्मा फुले चौक ते स्टेशन आणि पुढे जाण्यासाठी समांतर पून वजा रस्ता असणार आहे. 

स्टेशन परिसरात कार आणि केडीएमटी आणि एसटी बसेस उभ्या करण्याची व्यवस्था केली जाणार आहे, तर खाली रिक्षा आणि दुचाकी पार्क करण्यासाठी व्यवस्था असेल. हा सॅटिस 12 मीटर उंच असणार आहे. कल्याण रेल्वे स्थानकामधून बाहेर पडताच इच्छित स्थळी जाण्यासाठी सरकते जिने आणि लिफ्टची व्यवस्था असेल. 

कल्याण पूर्वमध्ये काय बदल होणार? 
कल्याण पूर्वमधील लोकग्राममधून एक पादचारी पूल रेल्वे स्थानकात जातो. तो तोडून तिथे स्कायवॉक बनविण्यात येणार आहे. लोकग्राम रेल्वे तिकिट घरच्या आजूबाजूचा परिसर विकसित करण्यात येणार आहे. तिथे रिक्षा, केडीएमटी बस स्थानक आणि पार्किंग प्लाझा विकसित केला जाईल. या परिसरात सिद्धार्थनगरमध्ये जाण्यासाठी स्कायवॉक आणि विकास आराखड्यानुसार रस्ता उपलब्ध होणार आहे. लोकग्राम तिकिट घराप्रमाणे सिद्धार्थनगर परिसरातही दुचाकी, चारचाकी पार्किंग प्लाझा, रिक्षा स्थानक, केडीएमटी बस स्थानक अशा विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच, पूर्व भागातही लिफ्ट, सरकते जिने, शौचालय, कचरा कुंडी अशा सुविधा उपलब्ध होतील. 

रेल्वे, महानगरपालिका, एसटी प्रशासनाच्या जागेचा वापर करत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण पूर्व-पश्‍चिममधील वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न याद्वारे होणार आहे. वाहने, फेरीवाले आणि नागरिक आपापल्या जागी सुरक्षित जाण्यासाठी या आराखड्यात मांडणी केली आहे. रेल्वे प्रशासनासोबत होणाऱ्या बैठकीमध्ये या प्रकल्पाचे सादरीकरण होणार आहे. याला मंजुरी मिळताच निविदा प्रक्रियेला सुरवात होणार असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com