मुंबई, ठाण्यातील भारनियमन मागे; उर्वरित राज्यातील 'अंधार' कायम!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

दिवसभरात राज्यातील अनेक भागात काही तासांचे भारनियमन करण्यात आले. राज्याची आजची विजेची मागणी 17800 मेगावॉट होती, तर 15800 मेगावॉट वीज महावितरणला उपलब्ध झाली.

मुंबई : महावितरणच्या अ आणि ब ग्राहक श्रेणीतील भारनियमन आज टप्प्याटप्प्याने मागे घेण्यात आले. त्यामुळे मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबईतील वीज ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला. पण उर्वरीत क ते जी 3 या ग्राहक श्रेणीतील ग्राहकांसाठी मात्र भारनियमनाचे चटके आणखी काही दिवस सहन करावे लागणार आहे.

आज दिवसभरात राज्यात काही ठिकाणी पावसाळी वातावरण असले तरीही विजेच्या भारनियमनात आज विशेष काही फरक पडला नाही. शहरी आणि ग्रामीण भागात आजही महावितरणने 2000 मेगावॉट विजेच्या तुटवड्यासाठी भारनियमन केले. 

दिवसभरात राज्यातील अनेक भागात काही तासांचे भारनियमन करण्यात आले. राज्याची आजची विजेची मागणी 17800 मेगावॉट होती, तर 15800 मेगावॉट वीज महावितरणला उपलब्ध झाली. राज्यातील भारनियमन कमी करण्यासाठी अधिक दराने वीज खरेदी करण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगानेही परवानगी दिली आहे. महावितरणचा 700 मेगावॉट वीज खरेदीचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे.

महावितरणला युनिटमागे आता 5.50 रूपयांपर्यंत वीज खरेदी करता येणार आहे. त्यामध्ये 500 मेगावॉट वीज राऊंड द क्‍लॉक पद्धतीने तर 200 मेगावॉट वीज दिवसापोटी खरेदी करण्याचा महावितरणचा निर्णय आहे. आज महानिर्मितीमार्फतही 4800 मेगावॉट वीज पुरवण्यात आली. तर कोयना विद्युत प्रकल्पातून 1400 मेगावॉट वीज आपत्कालीन स्थितीत राज्याला उपलब्ध झाली.

महावितरणने नोव्हेंबरपर्यंत 700 मेगावॉट वीज याआधीच अल्प मुदतीच्या खरेदी करारावर विकत घेतली आहे.

Web Title: marathi news marathi websites Mumbai News MSEDCL Load Shedding