घाईने लावलेला निकाल विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

कायदा विषयांत विद्यार्थ्यांना एक किंवा 15 गुण देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न संतापजनक आहे. या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या निकालाचा फेरविचार होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी विशेष समितीची स्थापना करावी. 
- सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ कौन्सिल

मुंबई : कायदा आणि वाणिज्य शाखांच्या परीक्षांचे निकाल 31 ऑगस्टपूर्वी जाहीर करण्याचा मुंबई विद्यापीठाचा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाबरोबर खेळ ठरू लागला आहे. कित्येक विद्यार्थ्यांचे निकाल अजूनही संकेतस्थळावर दिसत नाहीत. तर मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना 15 पेक्षा कमी गुण मिळाले असल्याने ते संतापले आहेत. 

निकालासंदर्भात न्यायालयासमोर हजर होण्यापूर्वीच्या मध्यरात्री मुंबई विद्यापीठाने कायदा शाखेच्या सर्व विषयांचे निकाल जाहीर केले. न्यायालयासमोर ही बाब प्रशंसनीय ठरेल, अशी आशा मुंबई विद्यापीठाला होती. 31 ऑगस्टला सायंकाळी संकेतस्थळावर निकाल दिसू लागले; परंतु बहुतांश विद्यार्थी अनुतीर्ण होते. केवळ 15 गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याचे समजते. अशा प्रकारच्या निकालाबाबतचा अंदाज अगोदरच कायदा विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांनीच नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केला होता. आता अनपेक्षित निकालामुळे विद्यार्थी चांगलेच भडकले आहेत. त्यातच आंबेडकर कायदा महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीला केवळ एकच गुण मिळाला आहे. वर्गात पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये तिचा पूर्वी क्रमांक होता. 

या संदर्भात स्टुडंट लॉ कौन्सिलने कुलगुरू आणि परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या संचालकांची सोमवारी भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या भेटीत विविध कायदा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केले. या भेटीत आंबेडकर लॉ कॉलेज, स्वामी विवेकानंद लॉ कॉलेज, गव्हर्न्मेंट लॉ कॉलेज, न्यू लॉ कॉलेज यांचे विद्यार्थी सामील होणार आहेत. 

Web Title: marathi news marathi websites Mumbai news Mumbai University