मनसेतून पक्षांतर केलेल्यांना स्थायी समितीची लॉटरी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

मुंबई - मनसेतून पक्षांतर केलेल्या सहा नगरसेवकांना स्थायी समितीच्या सदस्यत्वाची लॉटरी लागण्याची शक्‍यता आहे. स्थायी समितीतून 27 पैकी 13 सदस्य निवृत्त होत आहेत. सदस्यांची नियुक्ती करताना चिठ्ठ्यांद्वारे निर्णय घेतला जाणार आहे. 

मुंबई - मनसेतून पक्षांतर केलेल्या सहा नगरसेवकांना स्थायी समितीच्या सदस्यत्वाची लॉटरी लागण्याची शक्‍यता आहे. स्थायी समितीतून 27 पैकी 13 सदस्य निवृत्त होत आहेत. सदस्यांची नियुक्ती करताना चिठ्ठ्यांद्वारे निर्णय घेतला जाणार आहे. 

पक्षांतर करून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मनसेच्या सहा नगरसेवकांमुळे शिवसेनेचे पालिकेतील संख्याबळ वाढले आहे. यामुळे पालिकेतील प्रत्येक वैधानिक तसेच विशेष समितीत शिवसेनेचा एक सदस्य वाढणार आहे. पालिकेत चार वैधानिक तसेच 16 विशेष समित्या आहेत. समित्यांमधील या वाढीव जागेवर मनसेतून आलेल्या नगरसेवकांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. दिलीप लांडे हे मनसेचे पालिकेतील गटनेते होते. ते स्थायी समितीचेही सदस्य होते. आता ते शिवसेनेत गेल्यामुळे त्यांची पुन्हा स्थायी समितीवर वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. इतर सदस्यांनाही स्थायी समितीची लॉटरी लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

महापालिकेचा अर्थसंकल्प 26 हजार कोटींचा आहे. सर्व आर्थिक बाबींचे निर्णय घेण्याचे अधिकार स्थायी समितीला आहेत. यामुळे या समितीवर आपली वर्णी लागावी, अशी सर्व नगरसेवकांची इच्छा असते. स्थायी समितीत 27 सदस्य आहेत. त्यापैकी 13 सदस्यांची दर वर्षी नव्याने निवड केली जाते. ही निवड करण्यापूर्वी जुने सदस्य निवृत्त होतात. नव्या सदस्यांच्या नियुक्तीकडे आता शिवसेनेतील नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: marathi news MNS corporator mumbai news Members of Standing Committee