मोखाड्यात सशस्त्र दरोडा, पिस्तूल रोखून चार लाखांचा ऐवज लुटूला

भगवान खैरनार
गुरुवार, 8 मार्च 2018

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील व्यापारी चंद्रकांत किर्वे यांच्या घरात घुसून, त्यांच्यावर पिस्तूल रोखून त्यांच्या पत्नीला मारहाण करून तिघा दरोडेखोरांनी सोने व रोख रक्कमेसह चार लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला आहे. त्यामुळे मोखाडा तालुक्यात खळबळ उडाली असून मध्यवस्तीत रात्री 11 वाजेच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने तालुक्यातील सर्वच स्तरातील व्यापारी भयभीत झाले आहेत. 

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील व्यापारी चंद्रकांत किर्वे यांच्या घरात घुसून, त्यांच्यावर पिस्तूल रोखून त्यांच्या पत्नीला मारहाण करून तिघा दरोडेखोरांनी सोने व रोख रक्कमेसह चार लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला आहे. त्यामुळे मोखाडा तालुक्यात खळबळ उडाली असून मध्यवस्तीत रात्री 11 वाजेच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने तालुक्यातील सर्वच स्तरातील व्यापारी भयभीत झाले आहेत. 

मोखाड्यातील खोडाळा गावातील व्यापारी चंद्रकांत किर्वे यांच्या घरात घुसण्यासाठी नातेवाईकांच्या ओळखीचा बहाणा करीत तिन दरोडेखोरांनी प्रवेश केला. त्यांनी आपल्या तोंडावर रुमाल लाऊन दोघा दरोडेखोरांनी किर्वे यांच्यावर दोन्ही बाजूंनी पिस्तूल रोखले आणि घरातील सोने तसेच किंमती वस्तू आणि रोकडीची मागणी केली. या घटनेला विरोध करण्यासाठी त्यांची पत्नी मनिषा पुढे आली असता तिसऱ्या दरोडेखोराने तिच्यावर चॉपरने वार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात त्या बजावल्या मात्र, त्यांना मारहाण करित दरोडेखोरांनी कोपर्‍यात ढकलले असल्याची माहिती पिडीत चंद्रकांत किर्वे यांनी दिली आहे. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील कपाटाच्या चाव्या घेऊन सुमारे साडेतीन लाखाहून अधिक रकमेचे सोने आणि 45 हजार रोख रक्कम व दोन मोबाईल घेऊन दरोडेखोरांनी, घराला बाहारून कडी लाऊन पोबारा केला आहे.

जाताना या तिनही दरोडेखोरांनी या घटनेची वाच्यता केल्यास पुन्हा परत येऊन गोळ्या घालण्याची धमकी दिली असल्याचे किर्वे यांनी सांगितले आहे. तसेच आपण गावातील धनाढ्य व्यापाऱ्यांची माहीती घेतली असल्याची धमकी ही या दरोडेखोरांनी किर्वे यांना दिली आहे. 

या घटनेनंतर चंद्रकांत किर्वे यांनी रात्री 11:30 वाजता खोडाळा पोलीस ठाणे गाठले मात्र, तेथे कोणीही पोलीस हजर नसल्याचे आढळले. त्यानंतर एका सामाजिक कार्यकर्त्याने या घटनेची माहिती मोखाडा पोलीसांना दूरध्वनीवरून दिली. घटनेची माहिती मिळताच मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनवणे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी भेट दिली आहे. या घटनेची तक्रार चंद्रकांत किर्वे यांनी दाखल केली आहे. तथापी, सदरची घटना आमच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती घेऊन, नियोजन पूर्वक केली असल्याचा संशय किर्वे यांनी व्यक्त केला आहे. 

या घटनेनंतर मोखाडा पोलिसांनी दहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची किर्वे यांना प्रत्यक्ष बोलावून ओळख परेड केली आहे. मात्र, यात दरोडेखोर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्यवस्तीत, सर्वत्र लोकांची रेलचेल असतांना, दरोड्याची घटना घडली आहे. तसेच दरोडेखोरांनी व्यापार्यांची नावे सांगून पुन्हा दरोडा टाकण्याची धमकी दिल्याने , मोखाडा तालुक्यातील व्यापारी भयभीत झाले आहेत. त्यामुळे मोखाडा आणि खोडाळा या बाजारपेठांमध्ये रात्री पोलिसांची गस्त ठेवण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. तर या घटनेचे तातडीने तपासकार्य सुरू केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनवणे यांनी दिली आहे. 

Web Title: Marathi news mokhada news dacoity