मोखाड्यात आदिवासींच्या विकासासाठी खुंटी प्रकल्प

Mokhada
Mokhada

मोखाडा (पालघर) : आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सर्वात प्रथम पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवायला हवा असे प्रतिपादन जलबिरादरीचे राष्ट्रीय अध्यक्ष जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले आहे. ते मोखाड्यातील मोर्हांडा ग्रामपंचायतीमधील वाघायची वाडी येथे दिगंत स्वराज फाऊंडेशन द्वारे आयोजित शेतकरी मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. 

यावेळी आदिवासींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खुंटी ग्रामविकास प्रकल्पाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. मोखाड्यातील निळमाती, हिरवे, चास, खोच, पोशेरा, मोर्हांडा, गोंदे, आणि पळसुंडा या ग्रामपंचायतीमधील आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी खुंटी ग्रामविकास प्रकल्पाची संकल्पना जिल्हाधिकारी कार्यालय व दिगंत स्वराज फाउंडेशनच्या वतीने आखण्यात आली आहे. त्यासाठी सन 2018-19 या आर्थिक वर्षांत सुमारे 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला बचत गटांसाठी पोल्ट्री व्यवसाय, आधुनिक गोधडी शिलाई व्यवसाय सुरू करण्यात येणार आहेत. तर शेतकऱ्यांचे गट स्थापन करून भाजीपाला क्षेत्र विकास योजना, मोगरा लागवड, फळबाग लागवड, आंबा, काजू प्रक्रिया उद्योग, भुसुधार योजना, जलसंधारणाची कामे व पाणी पुरवठा आणि रेशीम लागवड करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा  यांनी तालुक्यातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना दिल्या आहेत.
 या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिगंत स्वराज फाउंडेशनच्या समवेत खुंटी नदीच्या परिसरातील ग्राम विकास प्रकल्पाचा शुभारंभ केला. या प्रकल्पात प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उत्तर दायित्व निधीतून एक कोटी रूपये उपलब्ध करून हा विकास प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. तर सुमारे 15 कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नारनवरे यांनी सांगितले आहे. स्वराज संस्थेच्या राहुल तिवरेकर यांनी तालुक्यातील पळस पाडा, तुळयाचा पाडा व खोच येथे असेलेल्या जलाशयातील पाण्याचा पुरवठा सभोवताली असलेल्या 70 गावांना करावा व शेतीला चालना द्यावी अशी मागणी केली. 

उपस्थित सरपंच व जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी तशा प्रकारचे ठराव करून कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या कडे सुपूर्द केले. कृषी विभागाने 'आत्मा' अंतर्गत नोंदणी केलेल्या गटांना नोंदणी प्रमाणपत्र वाटप डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते केले. 50 हुन अधिक गटांची नोंदणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश यांनी स्वराज फाउंडेशनच्या कामाची प्रशंसा केली व या ग्रामविकास प्रकल्पात सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

ग्लोबल कोकणचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी तालुक्यातील आदिवासी संस्कृती आणि परंपरेच्या आधारे आदिवासी पर्यटन स्थळे विकसित करण्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शेतकी तज्ज्ञांनी शेतकरी कंपनी व भाजीपाला व्यवस्थापन या विषयावर उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले आहे. या कार्यक्रमास मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ, जव्हारचे माजी नगराध्यक्ष दिनेश भट, दिगंत स्वराज फाउंडेशनचे संचालक अॅड. राहुल तिवरेकर यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com