नाणारसंबंधी घोषणा योग्य वेळी - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई - कोकण परिसरात नाणारचा प्रकल्प लादला जाणार नाही, तर स्थानिकांना विश्‍वासात घेऊनच त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील शिष्टमंडळाला दिले आहे. नाणार प्रकल्प रद्द करा, या मागणीसाठी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू झाले होते. नाणार प्रकल्प रद्द केल्याशिवाय परत जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. आज स्वाभिमानी पथकाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मध्यस्थी करत या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांच्या भेटीला नेले. प्रकल्प पूर्णतः रद्द केल्याची घोषणा न करता या वेळी मुख्यमंत्र्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला असल्याची माहिती शिष्टमंडळातील एका नेत्याने दिली.

नाणार प्रकल्प स्थानिकांवर लादला जाणार नाही. तेथील जनतेला विश्‍वासात घेऊनच यासंबंधी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांच्या या आश्‍वासनानंतर आंदोलकांनी ठिय्या मागे घेतला आहे. मात्र सरकारने शब्द फिरवल्यास पुन्हा आंदोलन तीव्र केले जाईल, असेही स्पष्ट केले आहे.

Web Title: marathi news mumbai bews nanar project chief minister