98 टक्के तक्रारींचा ऑनलाईन निपटारा! 

98 टक्के तक्रारींचा ऑनलाईन निपटारा! 

नवी मुंबई -  महापालिकेने प्रभावीपणे राबवलेल्या ई-गव्हर्नन्स प्रणालीला नवी मुंबईतील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईन संकेतस्थळावर आलेल्या तक्रारींपैकी 98.55 टक्के तक्रारींचा निपटारा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. सप्टेंबर 2016 पासून महापालिकेच्या ग्रीव्हन्स सिस्टीमवर 10 हजार 256 तक्रारी आल्या. त्यातील 10 हजार 106 तक्रारींचे निवारण झाले आहे. ऑनलाईन तक्रारींना महापालिकेकडून तत्काळ प्रतिसाद मिळत असल्याने नागरिकही समाधान व्यक्त करत असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नागरिकांना घर बसल्या प्रशासकीय कामांची सुविधा मिळावी; तसेच प्रशासकीय कामांमध्ये सुसूत्रता येऊन नागरिकांसह अधिकाऱ्यांना सोईचे व्हावे, यासाठी राज्य सरकारने ई-गव्हर्नन्स प्रभावी वापरण्याच्या सूचना सर्व सरकारी आस्थापनांना दिल्या आहेत. त्या धर्तीवर महापालिका प्रशासनाने राबवलेली ई-गव्हर्नन्स प्रणालीचा नवी मुंबईतील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने राबवलेल्या ऑनलाईन ई-तक्रार निवारण प्रणालीवर खुद्द आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांचे लक्ष आहे. यातील तक्रारींचा विश्‍लेषणात्मक आढावा घेऊन निपटारा करण्यात येत आहे. तक्रार प्रलंबित राहण्याचे कारण व तक्रार करून नागरिक समाधानी आहेत का? याची माहिती रामास्वामी अधिकाऱ्यांकडून घेत आहेत. ठराविक मुदतीत तक्रारींचे निराकरण होत नसेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई ऑनलाईन पद्धतीनेच केली जात आहे. त्यामुळे ऑनलाईन तक्रारींचा निपटारा करण्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. महापालिकेच्या ऑनलाईन ई-तक्रार निवारण प्रणालीवर सप्टेंबर 2016 पासून 21 फेब्रुवारी 2018 पर्यंत 10 हजार 256 तक्रारी आल्या. त्यापैकी 98.55 टक्के तक्रारींवर सात दिवसांच्या आत कार्यवाही करण्यात आलेली आहे. पाच हजार 243 म्हणजेच 52.87 टक्के तक्रारदारांनी अभिप्राय नोंदवला आहे. महापालिकेच्या ऑनलाईन तक्रारींमुळे 52.14 टक्के इतके नागरिक समाधानी असल्याची नोंद आहे. 

केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत घोषित केलेल्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2017-18 मध्ये नागरिक केंद्रभूत सेवांमधील विशेष उल्लेखनीय कार्य गटात महापालिकेला नामांकन मिळाले आहे. नामांकनासाठी देशभरातून निवडलेल्या पाच महापालिकांमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या ऑनलाईन ई-तक्रार निवारण प्राणालीचा समावेश आहे. 

383 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस 
ऑनलाईन आलेल्या तक्रारींचा तत्काळ निपटारा न करणाऱ्या 383 कामचुकार अधिकाऱ्यांना स्वयंचलित प्रणालीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तक्रार आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने 24 तासांत कार्यवाही करून सात दिवसांच्या आत ती निकालात काढणे बंधनकारक आहे. जर संबंधित अधिकाऱ्याने तक्रारीची दखल घेतली नाही, तर स्वयंचलित प्रणालीद्वारे ही तक्रार पुढील जबाबदार अधिकाऱ्याला पाठवली जाते. त्यानुसार दोन हजार 590 तक्रारी पहिल्या टप्प्यातील अधिकाऱ्यांकडून थेट विभागप्रमुखांकडे आल्या आहेत. त्यावर आयुक्तांच्या दालनात आठवड्याला होणाऱ्या विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत विश्‍लेषण होत असल्याने अशा वर्गीकृत होणाऱ्या तक्रारींचे प्रमाण 13 टक्‍क्‍यांवर आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com