बेस्टला गैरहजेरीमुळे होतोय तोटा प्रति किमी 20 टक्के

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

सद्यःस्थितीत बेस्टच्या कर्मचाऱ्यांपैकी दोन हजार जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे आढळलेय. त्यामुळेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या (सीएसआर) माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली आहे. 

मुंबई : संपूर्ण मुंबईभर वाहतुकीची सेवा पुरवणाऱ्या बेस्ट उपक्रमाचे कर्मचारी अनेक कारणांमुळे गैरहजर राहतात; परंतु या गैरहजेरीमुळे प्रत्येक किलोमीटरमागे उपक्रमाला तोटा होत आहे. बेस्ट उपक्रमाला होणाऱ्या तोट्यांपैकी 20 टक्के तोटा हा नुसत्या कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे होत आहे. त्यामध्ये मुख्यत्वेकरून आरोग्याच्या अडचणी सर्वाधिक असल्याची माहिती आहे. 

सद्यःस्थितीत बेस्टच्या कर्मचाऱ्यांपैकी दोन हजार जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे आढळलेय. त्यामुळेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या (सीएसआर) माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली आहे. 

इंधन कंपन्यांकडून निधी? 

बेस्ट उपक्रम इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, महानगर गॅस यांच्याकडून प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणावर इंधन खरेदी करत असते. त्यामुळेच यांसारख्या कंपन्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर सीएसआरच्या माध्यमातून खर्च करू शकतात. सीएसआरसाठी उपक्रमाला मदत करण्यासाठी उपक्रमाने तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करणे गरजेचे आहे.

उपक्रमाला सीएसआर निधीअंतर्गतच या व्यक्तीसाठी इन्सेन्टिव्ह देण्यात आला, तर त्याच्या पगाराचा खर्चाचा भार उपक्रमावर येणार नाही, अशी ठरावाची सूचना सुनील गणाचार्य यांनी केली आहे. बेस्टमधील महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठीही या निधीतून तरतूद करता येईल. बेस्टच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या कल्याणकारी योजनांमध्ये कपात करणे शक्‍य होईल, असेही त्यांनी सांगितले.  

Web Title: Marathi News Mumbai News BEST Transport Loss