बसपचा समविचारी पक्षांसोबत हातमिळवणीचा विचार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

बसपाच्या मुंबईतील कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी दादरमध्ये झाली. बैठकीत बसपाच्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेण्याबाबत चर्चा केली.

मुंबई : एकेकाळी सोशल इंजिनिअरिंगचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या बहुजन समाज पार्टीचे (बसपा) नेते आता राज्यातील आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जोमाने कामाला लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून या पक्षाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षांसोबत हातमिळवणी करण्याचा विचार सुरू केला आहे. 

बसपाच्या मुंबईतील कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी दादरमध्ये झाली. बैठकीत बसपाच्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेण्याबाबत चर्चा केली. या वेळी बहुतांश कार्यकर्त्यांनी त्याला अनुमोदन दिले. विधानसभा निवडणुकीत राज्यात चौथ्या क्रमांकाची मते मिळवणारा बसपा होता. विदर्भ, मराठवाडा, मुंबईत पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. ती अधिक उंचावण्यासाठी आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या राजकीय पक्षांना सोबत घेऊन आगामी निवडणूक लढवावी, असा सल्ला काही कार्यकर्त्यांनी बैठकीत दिला. त्याला पार्टीतील प्रमुख नेत्यांनीही दुजोरा दिला आहे. 

ऐक्‍यासाठी प्रयत्न 

भीमा कोरेगाव घटनेमुळे राज्यातील बहुजन समाजामध्ये तीव्र संताप आहे. या संतापाचे निवडणुकीच्या मतांमध्ये परिवर्तन व्हावे यासाठी आंबेडकरी विचारधारा मानणारे पक्ष कामाला लागले आहेत, परंतु गटातटाच्या राजकारणात कोणत्याच गटाचा फायदा होत नसल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गटांचे ऐक्‍य करण्याऐवजी प्रभावी संघटनांना सोबत घेण्याचे प्रयत्न बसपाकडून सुरू झाले आहेत. 

Web Title: Marathi News Mumbai News BSP will alliance other parties