...तोच खरा महाराष्ट्राचा सन्मान : राज्यपाल 

Mumbai News C Vidyasagar rao Thats is Honor of maharashtra
Mumbai News C Vidyasagar rao Thats is Honor of maharashtra

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला खेळाची मोठी परंपरा असली तरी महाराष्ट्राच्या खेळाडूने ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून दशके लोटली. दोन वर्षांनी टोक्‍योमध्ये होत असलेल्या ऑलिंपिकमध्ये पदक मिळवले तर तो महाराष्ट्राचा खरा सन्मान असेल, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी छत्रपती पुरस्कार वितरणात खेळाडू-संघटक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व्यक्त केले. 

मुंबईचे वैभव असलेल्या गेट वे ऑफ इंडिया येथे प्रथमच झालेल्या तीन वर्षांच्या छत्रपती पुरस्कार वितरणात राज्यपालांनी पुरस्कार प्राप्त खेळाडूंना शाबासकी दिली, नव्या पिढीसाठी आशावादही व्यक्त केला. त्याचवेळी वास्तवतेचेही भान मांडले. 2015-16, 16-17 आणि 17-18 या तीन वर्षांसाठीच्या पुरस्कार वितरणासाठी खेळाडू-मार्गदर्शक, तसेच कार्यकर्ते यांनी चांगलीच गर्दी केली होती. या सर्वांसमोर राज्यपालांनी व्यक्त केलेले वास्तव जाणीव करून देणारे होतेच, पण नवोदित खेळाडूंना स्फूर्ती देणारेही होते. 

राज्यपालांनी आपल्या मनोगतात थेट महाभारत-रामायणापासून सुरुवात केली. मल्लयुद्धाचा त्यांनी उल्लेख केला आणि स्वतंत्र भारताला पहिले ऑलिंपिक वैयक्तिक पदक महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी 1952 च्या हेसलिंकीत झालेल्या स्पर्धेत मिळवून दिले होते. त्यानंतर आजपर्यंत महाराष्ट्राच्या एकाही खेळाडूने ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकलेले नाही. 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूने पदक मिळवावे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. काही महिन्यांत आशियाई स्पर्धा होत आहे, तेथेही महाराष्ट्राचे खेळाडू पदक विजेते ठरावेत आणि तोच खरा महाराष्ट्राचा सन्मान असेल, असे ते म्हणाले. 

राज्यपालांनी केवळ कार्यक्रमाचे प्रमुख या नात्याने उपदेश दिले नाहीत तर वास्तवता व्यक्त करताना जमैका, क्‍युबा आणि इथिओपिया या देशांचीही उदाहरणे दिली. महाराष्ट्रापेक्षा कितीतरी पटीने कमी लोकसंख्या असलेल्या जमैकात जागतिक सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्ट तयार होतो. महिलांमध्ये थॉमसन ही धावपटू घडते. मुंबई मॅरेथॉनची मी सुरुवात करतो, तेथे इथिओपियाचे खेळाडू वर्चस्व गाजवतात. जागतिक स्पर्धांमध्ये जर्मनी-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हुकूमत गाजवतात; तर बॉक्‍सिंगमध्ये क्‍युबा पहिल्या स्थानावर राहते. या सर्वांपेक्षा महाराष्ट्र मोठा असला तरी ऑलिंपिक पदकविजेते तयार होत नाहीत, अशी खंत व्यक्त केली. 

इतिहासाचे दाखले देताना राज्यपालांनी बदलत्या युगाचाही उल्लेख केला. महाराष्ट्रात क्रीडा विद्यापीठ होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि त्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढे येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आर्थिक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर होत आहे. त्याचबरोबर आपला देशही सुपर पॉवर होत आहे, पण स्पोर्टस्‌ देश म्हणून आपला देश ओळखला जायला पाहिजे असे सांगताना राज्यपालांनी खेलो इंडियाचा उल्लेख केला. यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळवला. याचाच अर्थ महाराष्ट्राकडे गुणवत्ता आहे, मात्र ती घडवण्याचे कार्य प्रशिक्षकांना करावे लागेल. ग्रामीण महाराष्ट्रातून खेळाडू हुडकायला हवेत, असे त्यांनी आग्रहाने सांगितले. 

स्मार्टफोन टाळा मैदानात उतरा 

राज्यपालांनी आपल्या मनोगतात युवकांनाही मोलाचा सल्ला दिला. सध्याच्या युगात नवी पिढी स्मार्ट फोनवर अधिक काळ रमत असते. हे टाळून मैदानात उतरून खेळाबरोबर तंदुरुस्त महाराष्ट्र घडवण्याचाही आग्रह त्यांनी व्यक्त केला. 

संघटनांमध्ये खेळाडूच हवेत 
खेळाडूंबरोबर महाराष्ट्र घडवण्याचे जाहीर मत व्यक्त करणाऱ्या राज्यपालांनी संघटनांच्या कारभारावरही सडेतोड मत मांडले. संघटनांचा कारभार माजी खेळाडूंनीच चालवावा, त्यांनाच संघटना, असोसिएशन यामध्ये स्थान द्यावे, असे ते म्हणाले. 

पुरस्कारांमध्ये पारदर्शकता आणली 
तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर करण्यासाठी विलंब लागला हे खरे आहे, पण कोणावरही अन्याय होणार नाही आणि योग्य खेळाडूंनाच पुरस्कार मिळेल यासाठी गुणांकन पद्धत बदलली, ऑनलाईन अर्ज करण्याची प्रथा सुरू केली. 350 ते 400 तक्रारी आल्या, त्या सर्वांची शहानिशा करून अचूकता आणि पादर्शकता आणली, असे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com