सफाई कामगार भरतीत असंबद्ध प्रश्न

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई - 'भारताचे 44 वे सरन्यायाधीश कोण, मोठे नक्षत्र कोणते, विनेगारमध्ये काय असते किंवा गायनेशियम म्हणजे काय...' एखाद्या स्पर्धा परीक्षेतील वाटावीत असे काही प्रश्‍न मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या भरतीदरम्यान विचारण्यात आले होते. दहावी उत्तीर्ण कामगारांच्या भरतीत विचारण्यात आलेल्या या असंबद्ध प्रश्नांचा मुद्दा भाजपचे सदस्य भाई गिरकर यांनी विधान परिषदेत उपस्थित केला.

मुंबई महापालिकेने 1388 जागांसाठी नुकतीच सफाई कामगारांच्या भरतीची प्रक्रिया पूर्ण केली. यामध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांना अत्यंत कठीण प्रश्न विचारण्यात आले. सर्वसामान्य आणि मागास उमेदवारांना महापालिकेच्या नोकरीपासून दूर ठेवण्यासाठी असे प्रश्न विचारले का, असा सवाल गिरकर यांनी केला. याची दखल घेऊन सरकारने निवेदन करावे, असे आदेश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.

Web Title: marathi news mumbai news cleaning worker recruitment question