हद्दपार आरोपीचा पोलिसांवरच हल्ला ; हल्लेखोर पत्नीसह मेव्हण्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

या हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. आरोपीला भिवंडी पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांच्या आदेशाने 18 सप्टेंबर 2017 रोजी ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते; तरीही देवजीनगर येथे मेहुण्याकडे येऊन तो राहिला होता. 

भिवंडी : ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या भिवंडीतील आरोपीने पोलिसांवरच हल्ला करून पळ काढला. भिवंडी शहरातून गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली हद्दपार केलेला आरोपी आकाश ऊर्फ चिंकू सुरेश पवार (22, रा. शिवाजीनगर) प्रतिबंधित क्षेत्रात राहत असल्याचे समजताच त्याच्या अटकेसाठी भिवंडीतील नारपोली पोलिस ठाण्याचे पथक गेले होते. या वेळी आरोपीने त्याची पत्नी व मेहुण्याच्या मदतीने हल्ला करीत पोलिसांनाच मारहाण केल्याची घटना काल (ता. 3) रात्री शहरातील देवजीनगर येथे घडली. त्यानंतर आरोपीने पोलिसांना चकवा देत पळ काढला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे. 

या हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. आरोपीला भिवंडी पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांच्या आदेशाने 18 सप्टेंबर 2017 रोजी ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते; तरीही देवजीनगर येथे मेहुण्याकडे येऊन तो राहिला होता. 

पोलिस नाईक अमोल देसाई, शिपाई एस. एस. पाटील, टी. ए. सय्यद आदींचे पथक आरोपीला ताब्यात घेण्यासाठी घटनास्थळी गेले. या वेळी त्याची पत्नी सुमन व मेहुणा गणपत ऊर्फ ओमप्रकाश यादव यांनी पोलिसांवर हल्ला केला. या वेळी आरोपी आकाशने पोलिस कर्मचारी अमोल देसाई यांना खाली पाडल्याने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. या हल्ल्याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक व्ही. एम. खिलारे यांनी गुन्हा दाखल करून सुमन व गणपत या भाऊ-बहिणीला अटक केली आहे. 

 

Web Title: Marathi News Mumbai News Crime News criminal attacked police