परिवर्तनाद्वारे विरोधकांना घरी बसवणार : फडणवीस

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

नेरळ : भाजप सरकार जनतेच्या सेवेसाठी सत्तेवर आले. आम्हाला सत्ता उपभोगायची नसून राबवायची आहे. त्यामुळे परिवर्तन घडवून विरोधकांना कायमचे घरी बसवणार, असा ठाम विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कर्जत येथे भाजपच्या प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. 

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री व रायगडचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार किसन कथोरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रवीण दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी शिवसेनेचे माजी आमदार देवेंद्र साटम, माजी तालुकाप्रमुख राजाराम शेळके, रामदास ठोंबरे, माजी सभापती संध्या कराळे, निवृत्ती पिंगळे, माजी उपमुख्यमंत्री पंढरीनाथ राऊत, शिवसेनेचे तालुका सचिव संजय कराळे, माजी नगराध्यक्षा नूरजहॉं शेख, माजी विभागप्रमुख माधव कोळंबे, ज्ञानेश्‍वर भगत, आत्माराम पवार, परशुराम म्हसे, दिगंबर सणस, डी. एन. मिश्रा, काशीनाथ रसाळ, दिनेश भरकले, अनंत जुनगरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी कामगार पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. 

सभेत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ''माझे जवळचे मित्र देवेंद्र साटम यांच्या भाजप प्रवेशाने एका देवेंद्रच्या मदतीला दुसरा देवेंद्र आल्याचा मला अभिमान आहे. कर्जत मतदारसंघच नव्हे तर पूर्ण राज्यात परिवर्तन घडवून कित्येक वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या विरोधकांना कायमचे घरी बसवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.'' 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेवरही त्यांनी टीका केली. आणखी 10-15 वर्षे त्यांना आंदोलनेच करायची आहेत, अशी खिल्ली त्यांनी उडवली. शेतकऱ्यांचा कळवळा त्यांना सत्तेवर असताना आला नाही. ते म्हणाले, ''स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी 2004 मध्ये मंजूर झाल्या; पण त्याची आठवण त्यांना 2004 ते 2014 पर्यंत झाली नाही. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात स्वामिनाथन आयोगातील शिफारशीनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या 50 टक्के नफा देण्याची भूमिका आर्थिक तरतूद करून पूर्ण केली आहे.'' 

कर्जतमध्ये स्थानिकांच्या प्रश्‍नांवरही त्यांनी प्रकाश टाकला. कर्जत-पनवेलच्या लोकल सेवेबद्दल देवेंद्र साटम यांच्यासह आठवड्याभरात रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथील 40 गावांच्या नदीजोड प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न केले जातील. पेण अर्बन बॅंकेच्या ठेवीदारांसाठी सिडको हद्दीतील जमीन संपादन करण्याचे आदेश दिले आहेत. हे काम मार्गी लागल्यानंतर त्यांचे पैसे परत मिळतील, असे आश्‍वासन त्यांनी दिले. 

चांदीची तलवार स्वीकारली नाही 
कर्जतमधील स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी चांदीची तलवार आणली होती. मुख्यमंत्र्यांनी तलवार स्वीकारण्यास नकार दिला आणि कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. 

ऐनवेळी हेलिपॅड बदलले 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा निश्‍चित झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सूचना केल्याप्रमाणे चौक-कर्जत रस्त्यावर असलेल्या एनडी स्टुडिओत हेलिपॅडवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे हेलिकॉप्टर उतरणार होते. कालपर्यंत यात काही बदल नव्हता. एनडी स्टुडिओतर्फे बनवलेला सेल्फी पॉईंट हा अतिक्रमण करून बनवला आहे, त्यामुळे अतिक्रमकांच्या हेलिपॅडवर मुख्यमंत्री उतरणार का, अशी चर्चाही रंगली.

पुढील होणाऱ्या टीकेची आणि चर्चेची खबरदारी घेत मुख्यमंत्री कार्यालयाने हेलिपॅड शेवटच्या क्षणी बदलले. दुपारी मुख्यमंत्री फडणवीस यांचे हेलिकॉप्टर हे टाटा कंपनीच्या हेलिपॅडवर स्थिरावले. जिल्हा प्रशासनाने एनडी स्टुडिओचे हेलिपॅड नाकारण्याचे कारण विचारले असता या भागात उच्च दाबाच्या वीजवाहिन्या जात असल्याने हा बदल केल्याचे सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com