भाजपमधील नाराजांच्या संख्येत वाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

मुंबई : केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या नाराजीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विदर्भातील भाजपचे नेते, खासदार नाना पटोले यांनी राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपचे आमदार आशिष देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर नाराजी व्यक्‍त करीत राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. 

मुंबई : केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या नाराजीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विदर्भातील भाजपचे नेते, खासदार नाना पटोले यांनी राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपचे आमदार आशिष देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर नाराजी व्यक्‍त करीत राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. 

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष नाही, तसेच खासदारांचे ऐकून घेत नाहीत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करून नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पटोले यांच्यापाठोपाठ विदर्भातील भाजपचे आमदार देशमुख हेही राजीनामा देण्याच्या पवित्र्यात आहेत. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतसे भाजपमधील नाराज तोंडसुख घेत बाहेर पडण्यासाठी धडपतील अशी शक्‍यता सूत्रांकडून व्यक्‍त केली जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या पक्षावर टीका करीत आहेत. त्यांच्यावर अरोप झाल्याने त्यांना महसूलमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. खडसे यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काही जणांना भाजपमध्ये आणून त्यांना तिकिटे दिली होती. अशाप्रकारे भाजपमध्ये आलेले आयाराम आमदार झाले होते. मात्र सध्या हे आयाराम नाराज आहेत. कारण तीन वर्षे झाली तरीही त्यांची कामे होत नाहीत. तसेच, भाजपमध्ये त्यांना उपरे म्हणून वागणूक दिली जाते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हे सर्वजण बाहेर पडतील अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. यामध्ये 20 ते 22 जणांचा समावेश आहे. 

लाट ओसरल्याने पोटात गोळा 
गुजरातमध्ये काठावर बहुमत, राजस्थानमध्ये झालेल्या लोकसभेच्या दोन तर विधानसभेच्या एका मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत पराभव झाला, तर मतांचे विक्रमी अंतर कापून कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे देशात नरेंद्र मोदी यांची लाट ओसरली असल्याचे चित्र स्पष्ट झाल्याने मोदीलाटेत आलेल्या भाजप आमदारांच्या पोटात गोळा आला आहे. आगामी निवडणुकीत विजयी व्हायचे असेल तर घाम गाळल्याशिवाय पर्याय नाही, अशी त्यांची भावना झाली आहे.

Web Title: marathi news mumbai news Devendra Fadnavis Cabinet Ashish Deshmukh