ई-नाम पोर्टल शेतकऱ्यांच्या हिताचे : मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

मुंबई : राष्ट्रीय कृषी बाजार समितीमार्फत चालविण्यात येणारे ई-नाम हे पोर्टल शेतकऱ्यांच्या हिताचे असून, शेतमालासाठी राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध झाली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते राष्ट्रीय कृषी बाजार समितीच्या कामकाज आढावा बैठकीत बोलत होते. 

मुंबई : राष्ट्रीय कृषी बाजार समितीमार्फत चालविण्यात येणारे ई-नाम हे पोर्टल शेतकऱ्यांच्या हिताचे असून, शेतमालासाठी राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध झाली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते राष्ट्रीय कृषी बाजार समितीच्या कामकाज आढावा बैठकीत बोलत होते. 

ई-नाम हे राष्ट्रीय स्तरावरील वेब पोर्टल आहे. त्याद्वारे सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांबाबत माहिती एकत्रित ठेवण्यात येते. या पोर्टलसंदर्भात आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या पोर्टलसाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करून त्यासाठी लागणारे तांत्रिक सहकार्य, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांसाठी सरकार सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे आश्‍वासन या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यातील सर्व बाजार समित्यांनी मध्यस्थांची भूमिका बजावून देशातील उत्तम बाजारपेठ तयार करण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

या वेळी पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी राज्यातील सर्व कृषी व्यापारी व शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यासाठी बाजार समितींचे संगणकीकरण आणि पायाभूत सुविधांचे बळकटीकरणही करण्यात येणार आहे. 

या बैठकीला मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास, पणन संचालक डॉ. अनंत जोग, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, लघु शेतकरी कृषी संघाचे कार्यकारी संचालक सुमंत चौधरी, महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम प्रकल्पाचे डा. अरुण कुलकर्णी, बाजार समित्यांचे सचिव आणि सभापती, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

या पोर्टलमुळे व्यवहारात पारदर्शकता आली असून, शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. आतापर्यंत 1.92 लाख शेतकऱ्यांनी यामध्ये नोंदणी केली असून, पहिल्या टप्प्यात 45 मंडईची नोंदणी झाली आहे. लवकरच 60 मंड्यांची नोंदणी पूर्ण होणार आहे. या पोर्टलवर ऑनलाईन व्यवहाराचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. पोर्टलसंबधी जागृती करण्यासाठी राज्यव्यापी अभियान हाती घेण्यात येणार असून, यामार्फत खरीप हंगामामध्ये शेतमालाला योग्य भाव मिळणार आहे. 
- विजयकुमार, प्रधान सचिव, कृषी विभाग

Web Title: marathi news mumbai news Devendra Fadnavis Cabinet eNAM portal