पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज भव्य नागरी सत्कार

Eknath_Shinde
Eknath_Shinde

डोंबिवली : डॉ. तात्याराव लहाने, प्रा. राम शिंदे, डॉ. उदय निरगुडकर, गजानन कीर्तिकर, रवींद्र चव्हाण, जयंत पाटील, नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी नवनिर्वाचीत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेतर्फे कल्याण शीळ रस्त्यावरील प्रीमियर मैदानावर होणार आहे.

ठाणे जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकावणारे आणि नुकतेच शिवसेनेच्या नेतेपदी निवड झालेले ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार आज शनिवारी (ता. 3) डोंबिवलीच्या प्रीमियर मैदानावर करण्यात येणार आहे. शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने शिवसेना कल्याण लोकसभेने या भव्य सत्काराचे आयोजन केले आहे.

 पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, शिवसेनेचे नेते-खासदार गजानन कीर्तिकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, शेकापचे आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेत्र शल्य चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने, न्यूज 18 लोकमतचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

सामान्य शिवसैनिकापासून सुरू झालेली शिंदे यांची राजकीय कारकीर्द आज शिवसेनेच्या नेतेपदापर्यंत पोहोचली आहे. शाखाप्रमुख, नगरसेवक, सभागृहनेता, आमदार, जिल्हाप्रमुख, विरोधी पक्षनेता, कॅबिनेट मंत्री आणि आता शिवसेना नेता अशी उत्तरोत्तर प्रगती करत असतानाच धर्मवीर आनंद दिघे यांच्या अकाली निधनानंतर जिल्ह्यातील शिवसेनेची सूत्रे सांभाळत त्यांनी शिवसेनेचे ठाणे हे समीकरण अधिक घट्ट करण्याची कामगिरी बजावली. ठाणे जिल्ह्याच्या इतिहासात यंदा प्रथमच जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला, तर गतवर्षी झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत देखील शिवसेनेला प्रथमच एकहाती सत्ता प्राप्त झाली.
 
जिल्ह्यातील अनेक विकासकामांना दिशा देण्याचे काम शिंदे यांनी केले. क्लस्टर डेव्हलपमेंट, एसआरए, मेट्रो, रस्त्यांचे भक्कम जाळे, पाणीपुरवठा अशा अनेक विकास प्रकल्पांना शिंदे यांनी गती दिली. त्यांच्या या कामगिरीची दखल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेऊन त्यांची नुकतीच नेतेपदी निवड केली. ठाणे जिल्ह्याला मिळालेला हा बहुमान हा शिवसैनिकांचाच सन्मान आहे, या भावनेने एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com