मुलीच्या जन्मदाखल्यावर वडिलांचे नाव नको !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

मुंबई - मुलीच्या जन्मदाखल्यात वडिलांचे नाव नमूद न करण्याची 22 वर्षीय अविवाहित मातेची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मंजूर केली.

या तरुणीच्या याचिकेवर न्या. अभय ओक आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

मुंबई - मुलीच्या जन्मदाखल्यात वडिलांचे नाव नमूद न करण्याची 22 वर्षीय अविवाहित मातेची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मंजूर केली.

या तरुणीच्या याचिकेवर न्या. अभय ओक आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

मुलीचा जन्म पाच वर्षांपूर्वी झाला असून, मुंबई महापालिकेच्या जन्मनोंदणी कार्यवाहीनुसार त्याची नोंदही करण्यात आली आहे. मात्र कालांतराने महिलेने मुलीच्या जन्मदाखल्यासह अन्य कागदपत्रांवरील वडिलांचे नाव काढून टाकण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. तसे करण्यास पालिका अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. कोणत्याही सबळ कारणाशिवाय जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्रामध्ये फेरफार करता येणार नाही, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यामुळे महिलेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान महापालिकेने संबंधित महिलेला नव्याने मुलीचा जन्मदाखला द्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले.

अविवाहित महिलांच्या इच्छेनुसार त्यांच्या मुलांच्या जन्मप्रमाणपत्रावर वडिलांचे नाव घालण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात दिली आहे. या निकालाचा दाखलाही खंडपीठाने दिला; मात्र महापालिकेच्या अन्य कागदपत्रांवरील वडिलांचे नाव काढण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली नाही. पालिकेच्या नोंदीसाठी आई आणि वडिलांचे नाव नोंदणीकृत असणे गरजेचे आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले. त्यामुळे महिलेला केवळ मुलीच्या जन्मदाखल्यावरील वडिलांचे नाव वगळता येऊ शकते.

Web Title: marathi news mumbai news girl birth certificate father name demand high court