सरकारी अनास्थेमुळे मातेवर आत्महत्या करण्याची वेळ

अक्षय गायकवाड
मंगळवार, 30 जानेवारी 2018

विक्रोळी पार्कसाईट येथे एका महिलेने आपल्या मुलीला समाजकंटकाकडून होणाऱ्या त्रासाबाबत विक्रोळी पार्कसाईट पोलिस तक्रार घेत नसल्याने पोलिस ठाण्यामध्येच विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (ता. 28) रात्री घडली.

मुंबई : सरकारी अनास्थेमुळे मंत्रालयात धर्मा पाटील या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याची घटना ताजी असतानाच विक्रोळी पोलिस ठाण्यात असा प्रकार घडला आहे. मुलीच्या छेडछाडीची तक्रार नोंदवत नसल्याने अगतिक झालेल्या मातेने जीवन संपविण्याचा प्रयत्न केला.

विक्रोळी पार्कसाईट येथे एका महिलेने आपल्या मुलीला समाजकंटकाकडून होणाऱ्या त्रासाबाबत विक्रोळी पार्कसाईट पोलिस तक्रार घेत नसल्याने पोलिस ठाण्यामध्येच विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (ता. 28) रात्री घडली. शीला मोर्या (४०) असे या महिलेचे नाव असून त्या विक्रोळी पार्कसाईट च्या वर्षानगर विभागात राहतात. त्यांची मुलगी सुषमा हिला याच विभागातील सनी बोरडे (२४) आणि संतोष निगडेकर (३०) हे वारंवार छेड काढत होते. अश्लील भाषेचा वापर करत असे. रविवारी देखील हि तरुणी आपल्या आई सोबत जात असताना या आरोपीनी त्यांना अश्लील भाषेचा वापर केला. याबाबत पार्कसाईट पोलिस ठाण्यात त्या तक्रार करण्यासाठी  गेल्या असता पोलिस त्यांच्या तक्रार नोंदवून घेत नव्हते. या अगोदर देखील त्या जेव्हा जेव्हा असे प्रकार घडत होते तेव्हा तेव्हा त्या पार्कसाईट पोलिस ठाण्यात वारंवार खेटा घालून कारवाईची मागणी करीत होत्या. परंतु तक्रार नोंदविली जात नव्हती. असेच प्रकार घडत असल्याने अखेर रविवारीदेखील पोलिस तक्रार नोंदवून घेत नाहीत असे दिसू लागल्याने शीला मोर्या यांनी पोलिस ठाण्यातच औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तत्काळ घाटकोपर च्या राजवाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर राजवाडी रुग्णालयातील अतिदक्षता रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अखेर शीला यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे प्रकरण पोलिसांवर येईल म्हणून पोलिसांनी दोन्ही आरोपींवर कलम ५०९,५०६,३४ अंतर्गत जामीनपात्र कलमे लावून गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आणि त्वरित त्यांची जामीनावर मुक्तता हि झाली. या प्रकरणात मोर्या कुटुंबाने पोलीस जबाब मध्ये एका राजकीय पक्षाच्या नेत्याचे हि नाव घेतले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात मुंबई पोलिस आयुक्त आणि मुख्यमंत्री यांनी लक्ष द्यावे अशी मागणी मोर्या कुटुंब करीत आहेत.

Web Title: Marathi news Mumbai news girl harassment in Vikroli