13 तालुक्यातील आदिवासी वाड्यांना 'मदतीचा हात'

Help
Help

उल्हासनगर : ग्रामीण भागात येणाऱ्या तब्बल 13 तालुक्यात जाऊन आणि आदिवासी नागरिकांच्या वाड्यांना, पाड्यांना, तसेच शाळांना भेटी देऊन त्यांना धान्य, कपडे, ब्लॅंकेट, चादरी, चपला, विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य अशा मदतीच्या हाताचा उपक्रम उल्हासनगरातील एक अवलिया गेल्या पावणेदोन वर्षांपासून राबवत आहे. विजय कदम असे या अवलियाचे नाव असून ही मानवतावादी सेवा ते त्यांच्या "एक हात मदतीचा" या सेवाभावी संस्थेच्या वतीने करत आहेत.

उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारे विजय कदम हे सुमारे अडीच वर्षांपूर्वी त्यांच्या मित्रांसोबत भंडारदरा येथे गेले होते. तेव्हा परतीच्या मार्गावर असताना आदिवासी वाड्या पाड्यातील विदारक परिस्थिती निदर्शनास आली. चूल, मोजकेच भांडे, कपड्यांअभावी उघडे शरीर, घरात धान्य नाही, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य नाही. हे बघितल्यावर यापुढे ग्रामीण तालुक्यातील आदिवासींना, विद्यार्थ्यांना मदतीचा द्यायचा असा निर्धार विजय कदम यांनी केला. 

त्यासाठी कदम यांनी त्याचे मित्र, हितचिंतक यांना जुने कपडे, चप्पल,बूट, चादरी, ब्लॅंकेट, धान्याची हाक दिली. प्रतिसाद मिळू लागला. विजय कदम यांनी एक हात मदतीचा या संस्थेचे उपाध्यक्ष रवि वलेचा, अमोल शिंदे, उपसचिव करण दराडे, खजिनदार जयेश बेलदार, सदस्य सुरज राजगुरु, योगेश तांदळे, गणेश पालवे, प्रविण पवार, निखिल बिजवे, दिनेश वारे, राकेश हिरवे, सुरेंद्र पंजाबी, राहुल वायकर, विनोद सोनार आदिंच्या सोबतीने व संजय शेलार, जया जाधव, शुभदा पिंपळे यांच्या सहकार्याने मोखाडा, जव्हार, डहाणू, कर्जत, शहापूर, मुरबाड, कल्याण, त्र्यंबकेश्वर, वणी, ओझर, अकोले अशा 13 तालुक्यातील आदिवासी वाड्यांना, पाड्यांना तसेच शाळांना भेटी दिल्या आणि त्यांना धान्य, कपडे, चप्पल, बूट, चादरी, ब्लॅंकेट व विद्यार्थ्यांना देखील चपला, बुटांसह बॅग पुस्तके, वह्या, पेन, पेन्सील अशा संपूर्ण शैक्षणिक साहित्याच्या संचाचे वाटप केले. 

यासोबतच काही महिन्यांपूर्वी विक्रमगड तालुक्या मधील रमेश चौधरी या आदिवासीची झोपडी जळून बेचिराख झाली होती. संसार उघड्यावर आला होता. अशा प्रसंगी विजय कदम यांनी एक हात मदतीचा वतीने या आदिवासी परिवाराला पाच हजार रुपये रोख, वाड्यामधील दीपक धनकर या आदिवासीच्या अंगावर विजेची तार पडून मृत्यू झाला. तेव्हा धनगर यांच्या परिवाराला दहा हजार रुपये रोख, शहापूर मध्ये अर्धवट बांधलेल्या घरात सर्पांचा वावर. त्यात अवघ्या नऊ वर्षाच्या लक्ष्मण पवार या चिमुकल्याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. त्याच्या परिवाराला पाच हजार रुपये रोख असा मदतीचा हात देताना या कुटुंबियांना तीन महिन्यांचा साठाही दिला होता. 

गेल्या पावणेदोन वर्षात ग्रामीण भागातील तालुक्यात मदतीच्या हाताचा उपक्रम राबवणाऱ्या विजय यांनी उल्हासनगरमधील आरजीएस या शाळे समोर असलेल्या तुटक्या चेंबर्समुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका असल्याबाबत पालिकेचे लक्ष वेधले होते. आयुक्त राजेंद्र निंबाळकर, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी तसेच शिवसेना नगरसेवक धनंजय बोडारे, नगरसेविका शितल बोडारे, वसुधा बोडारे यांच्या उपस्थितीत हे चेंबर्स तात्काळ बदलण्यात आले. 

स्कायवॉकवर रात्रीच्या वेळी होणारे हल्ले, लूटमार याबाबत पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांना निवेदन दिले होते. गोयल यांनी याची दखल घेताना रात्री 8 ते 1 अशी पोलिसांची गस्त तैनात केली आहे. त्यामुळे स्कायवॉकवरील गुन्हेगारी नियंत्रणात आली आहे. 

आदिवासी वाड्या पाड्या यांना भेटी देऊन त्यांना मदतीचा हात दिला जातो. हे काम एकट्याचे नसून संयुक्तिक आहे. नागरिक देत असलेले जुने कपडे, चादरी, बूट, दाणी मंडळींचे थोडेफार प्रसंगानुसार आर्थिक सहकार्य तिथे पोहचवण्याचे काम एक हात मदतीचा या संस्थेच्या वतीने केले जाते. हे काम पुढेही अविरत सुरूच ठेवणार. अशी माहिती विजय कदम यांनी सकाळशी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com