परदेशात फराळ पाठवा 330 रुपयांत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

मुंबई : दिवाळीचा फराळ परदेशातील नातेवाईक किंवा मित्रमंडळींना पाठवायचा असेल, तर पोस्टाने एक नवीन योजना आणली आहे. "इंटरनॅशनल ट्रॅक पॅकेट सर्व्हिस' या योजनेत 330 रुपयांत आंतरराष्ट्रीय पार्सल पाठवता येईल. महत्त्वाचे म्हणजे हे पार्सल पोचेपर्यंत 'ट्रॅक' करता येईल. 

मुंबई : दिवाळीचा फराळ परदेशातील नातेवाईक किंवा मित्रमंडळींना पाठवायचा असेल, तर पोस्टाने एक नवीन योजना आणली आहे. "इंटरनॅशनल ट्रॅक पॅकेट सर्व्हिस' या योजनेत 330 रुपयांत आंतरराष्ट्रीय पार्सल पाठवता येईल. महत्त्वाचे म्हणजे हे पार्सल पोचेपर्यंत 'ट्रॅक' करता येईल. 

ई-कॉमर्सचा वाढता ट्रेंड पाहून पोस्टाने ही योजना 12 देशांसाठी सुरू केली आहे. परदेशात पार्सल पाठवण्यासाठी खासगी कुरिअर सेवांच्या तुलनेत हा सर्वांत स्वस्त पर्याय असल्याचा दावा करण्यात येत आहे. आशिया प्रशांत क्षेत्रातील देशांसाठी ही सुविधा असेल. ऑस्ट्रेलिया, कम्बोडिया, हॉंगकॉंग, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, न्यूझीलंड, फिलिपिन्स, सिंगापूर, दक्षिण कोरिया, थायलंड, व्हिएतनाम या देशांमध्ये 330 रुपयांत पार्सल पाठवता येईल. पहिल्या 100 ग्रॅम वजनासाठी हे दर आहेत. त्यापुढील प्रत्येक 100 ग्रॅमसाठी सरासरी 35 ते 45 रुपये पडतील. कमाल दोन किलो वजनाचे पार्सल या सेवेअंतर्गत पाठवता येईल. 

'ट्रॅक' आणि 'ट्रेस' ही सुविधा प्रत्येक पार्सलसाठी असेल. एखादे पार्सल हरवले किंवा त्याचे नुकसान झाले, तर त्याची भरपाईही मिळेल. "इंटरनॅशनल ट्रॅक पॅकेट'ची सुविधा ही पोस्टाच्या सर्व कार्यालयांत, तसेच बुकिंग सेंटरच्या ठिकाणी आहे. 

पुढील आठवड्यात मुहूर्त 
पोस्टाच्या दादर, मांडवी, परेल, चिंचबंदर आदी कार्यालयांत ही योजना येत्या आठवड्यात सुरू होणार आहे. टप्प्याटप्प्याने देशभरातील कार्यालयांमध्ये ती सुरू होईल. ग्राहकांना सध्याच्या स्पीड पोस्टच्या सेवेप्रमाणेच कोणतीही वस्तू या सेवेअंतर्गत "ट्रॅक' करणे शक्‍य होईल.

Web Title: Marathi news Mumbai news India Post special Diwali service