अनुदान रोखण्याच्या इशाऱ्यानंतर 'केडीएमटी' प्रशासनाची धावपळ 

रविंद्र खरात
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

कल्याण : 'कामात सुधारणा न केल्यास केडीएमटीचे अनुदान रोखू' असा इशारा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राहुल दामले यांनी प्रशासनाला दिला. त्यानंतर केडीएमटी प्रशासन कामाला लागले असून आज (बुधवार) प्रशासन आणि स्थायी समितीने नवी मुंबई मनपा परिवहन मुख्य कार्यालय आणि डेपोला भेट देत पाहणी केली. 

कल्याण : 'कामात सुधारणा न केल्यास केडीएमटीचे अनुदान रोखू' असा इशारा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राहुल दामले यांनी प्रशासनाला दिला. त्यानंतर केडीएमटी प्रशासन कामाला लागले असून आज (बुधवार) प्रशासन आणि स्थायी समितीने नवी मुंबई मनपा परिवहन मुख्य कार्यालय आणि डेपोला भेट देत पाहणी केली. 

एकेकाळी अव्वल स्थानी असलेला केडीएमटी उपक्रम दिवसेंदिवस डबघाईला आला आहे. तरीही प्रशासनामध्ये सुधारणा होत नसल्याचे पाहून दामले यांनी गेल्या बुधवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत प्रशासनाला चांगलेच खडेबोल सुनावले होते. 'सुधारणा होत नसेल, तर अनुदान रोखून खासगीकरण करू' असा इशाराही त्यांनी दिला होता. याची केडीएमटी प्रशासनाने तातडीने दखल घेतली. 

'नवी मुंबई मनपा परिवहन सेवेचा कारभार कसा चालतो' याची पाहणी करण्यासाठी आखलेला आजचा दौरा याच पार्श्‍वभूमीवर असल्याची चर्चा रंगली होती. सभापती संजय पावशे यांच्या नेतृत्त्वाखाली सदस्य राजेंद्र दीक्षित, सुभाष म्हस्के, संतोष चव्हाण, मनोज चौधरी, संजय राणे, मधुकर यशवंतराव, कल्पेश जोशी, परिवहन अधिकारी श्‍याम पष्टे, तृशांत मुळीक, प्रमोद बागुल आदींनी दौऱ्यात भाग घेतला. 

या समितीने प्रथम बेलापूरमधील मुख्य कार्यालयात सभापती प्रदीप गवस आणि व्यवस्थापक शिरीष आधारवाड यांची भेट घेतली. त्यानंतर नवी मुंबई मनपा परिवहन सेवेच्या वॉररूमला भेट देत तेथील मोबाईल ऍप आणि जीपीआरएसची माहिती घेतली. सर्वसामान्य प्रवाशांना मोबाईलवर बस कुठे आहे आणि स्वत:चे ठिकाण पाहता येईल आणि दर 30 सेकंदांना एकूण ताफ्यापैकी धावत असलेल्या बसमधील तिकीट विक्रीतून किती उत्पन्न मिळाले, याची माहिती काही क्षणांमध्ये मिळते. 'केडीएमटीमध्ये आतातरी सुधारणा होईल का' असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

उशीराने सुचले शहाणपण 
'जवळच असलेल्या नवी मुंबई मनपा परिवहन सेवेमध्ये अनेक बदल झालेले असतानाही राज्याबाहेर दौरे का केले' असा प्रश्‍न उपस्थित केला जात असून 'हे बदल करण्याबाबत आम्ही पहिल्या दिवसापासून मागणी करत आहोत' अशी माहिती सदस्य संतोष चव्हाण यांनी दिली. 

बदल निश्‍चित करू ... 
कल्याणमधील केडीएमटीचे खंबाळपाडा, वसंत व्हॅली डेपो डेव्हलप होत असून संगणकीकरण होत आहे. नवी मुंबईप्रमाणे आम्ही ही योजना राबविणार असून जे अधिकारी हलगर्जीपणा करतील त्यांना बाहेरचा दरवाजा दाखवू असा इशारा सभापती संजय पावशे यांनी दिला आहे . 

उशिरा सुरू झाला दौरा; सभापती संतापले 
आज केडीएमटी समिती सदस्य आणि अधिकारी वर्गाचा पूर्वनियोजित दौरा असताना नवी मुंबई मनपा परिवहन उपक्रमामधून पाठपुरावा सुरू होता; मात्र ज्या दिवशी दौरा सुरू होणार त्या दिवशी केडीएमटी अधिकारी उशिरा आल्याने सभापती संजय पावशे यांनी चांगलेच खडेबोल सुनावले. प्रति दिन 6 ते 7 लाख केडीएमटीचे उपन्न वाढले नाही तर सर्वांना घरी बसविले जाईल असा सज्जड दमही दिला. अधिकारी वर्ग उशिरा आल्याने दौरा उशिरा सुरू झाला होता.

Web Title: marathi news mumbai news KDMT Kalyan