माणगावात बिबट्याची शिकार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

वन विभागातील गोंधळ 
मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. बिबट्याचा मृतदेह तिथे नेण्याऐवजी परळमधील बैलघोडा रुग्णालयात नेल्याने वन विभागातील गोंधळ पुन्हा उघड झाला आहे. 

मुंबई : रायगडमधील माणगाव वन विभागाच्या हद्दीत बिबट्याची शिकार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. बिबट्याचा मृतदेह विच्छेदनासाठी परळमधील बैलघोडा रुग्णालयात आणण्यात आला आहे. या बिबट्याला नखे व दात नसल्याने ही शिकारीची घटना असल्याचे बैलघोडा रुग्णालयाचे सचिव डॉ. के. सी. खन्ना यांनी सांगितले. 

माणगाव वनविभागांतर्गत येणाऱ्या तळा तालुक्‍यातील मौजे कुडे येथील खासगी जमिनीवर बिबट्या मृतावस्थेत सापडला. ही जमीन वीरेन छाब्रा यांच्या मालकीची आहे. रविवारी सायंकाळी सुरक्षा अधिकाऱ्यांना बिबट्याचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांनी त्वरित वन विभागाकडे तक्रार नोंदवली. मृतदेहाचा एक्‍स रे काढून आणि ऑपरेशन करून पाहावे लागेल, अशी माहिती स्थानिक वन विभागाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. तिथे आवश्‍यक साधने नसल्याने बिबट्याचा मृतदेह मुंबईला आणण्यात आला. 

चार वर्षांच्या या नर बिबट्याचा मृतदेह घेऊन माणगावचे वन अधिकारी मंगळवारी सायंकाळी बैलघोडा रुग्णालयात आले. मृत प्राण्याचे एक्‍स रे किंवा ऑपरेशन होऊ शकत नसल्याने शवविच्छेदन करण्यास बैलघोडा रुग्णालय तयार झाले. बिबट्याच्या तोंडाचा भाग पूर्णतः कुजला आहे. पायाची नखे आणि दात गायब असल्याचेही लक्षात आले. त्यावरून या बिबट्याची शिकार झाली असल्याची माहिती डॉ. खन्ना यांनी दिली. वैद्यकीय वापरासाठी बिबट्याचे दात आणि नखांना मोठी मागणी असते. हे लक्षात घेऊन बिबट्याची शिकार झाल्याचा संशय डॉ. खन्ना यांनी व्यक्त केला. शवविच्छेदन बुधवारी (ता. 6) करण्यात येईल. 

वन विभागातील गोंधळ 
मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. बिबट्याचा मृतदेह तिथे नेण्याऐवजी परळमधील बैलघोडा रुग्णालयात नेल्याने वन विभागातील गोंधळ पुन्हा उघड झाला आहे. 

Web Title: Marathi news mumbai news leopard killed in mangaon