साहित्यिकांनो, थोडी बंडखोरी करा : प्रवीण दवणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

पोटाच्या भीतीने आपल्याला विश्‍वभाषेकडे नेले; पण मनातील भीतीने आपल्याला मातृभाषेकडे गेले पाहिजे. भाषा निसटली तर आयुष्य निसटून जाईल. समाजजागृतीसाठी लेखणी चालवा. त्यासाठी सपकपणा सोडून थोडी बंडखोरी केली पाहिजे.

- ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे

ठाणे : पोटाच्या भीतीने आपल्याला विश्‍वभाषेकडे नेले; पण मनातील भीतीने आपल्याला मातृभाषेकडे गेले पाहिजे. भाषा निसटली तर आयुष्य निसटून जाईल. समाजजागृतीसाठी लेखणी चालवा. त्यासाठी सपकपणा सोडून थोडी बंडखोरी केली पाहिजे, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांनी शनिवारी येथे दिला. मातृभाषा आणि विश्‍वभाषा समांतर ठेवली पाहिजे. मातृभाषेला डावलले तर परिस्थिती भयावह होऊन पुढे समुपदेशकही सापडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्ती संस्था आणि सीकेपी ज्ञातिगृह ट्रस्ट यांच्या वतीने पहिले सीकेपी साहित्य संमेलन ठाण्यातील सीकेपी सभागृहात शनिवारी झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून दवणे यांनी साहित्यिकांना मार्गदर्शन केले. संमेलनाचे उद्‌घाटन अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल राम प्रधान यांनी केले. या वेळी स्वागताध्यक्ष मोहन गुप्ते, डॉ. अनंत देशमुख, सुधाकर वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. दवणे यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत आलेले अनुभव या वेळी सांगितले. ते म्हणाले, की ज्ञाती समाजाच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो. कारण, इथे निवडणूक असते; मात्र तिथे अवडणूक आहे. वर्षभरापूर्वी साहित्य संमेलनानिमित्त साहित्य परिक्रमा केली, तेव्हा नियम दाखवून रसिकांना दूर ठेवणे, विविध संस्थांचा हस्तक्षेप आदी गोष्टी लक्षात आल्या. अखिल भारतीय साहित्य संमेलनाला विचारवंत आणि चिंतनशील अध्यक्ष मिळो हीच प्रार्थना केवळ आपण करू शकतो. 

ज्ञातीतील साहित्यिकांनी लिखाणात सातत्याने बदल केले पाहिजे. समाजात जनजागृतीपर लिखाण झाले पाहिजे. सर्व प्रकारचे सृजन प्रवाह एकत्र यावेत, हा ज्ञातीच्या संमेलनांचा उद्देश आहे. तिथे जाण्यात काहीच गैर नाही. नव्या लेखकांना संपादक, समीक्षक भेटत नाहीत. त्यामुळे समाजमाध्यमांवर कोणताही अभ्यास न करता केवळ लाईक्‍स मिळावेत म्हणून काहीही लिहिले जात आहे. त्यांच्या लेखणीला धार देण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी केवळ कार्यक्रमांत पद भूषवून चालणार नाही. तंत्रज्ञानाची गुलामी करत बसलो तर नवनिर्मिती थांबेल, असे ते म्हणाले. आपण टेक्‍नोसॅव्ही झालो आहोत की टेक्‍नोस्लेव्ही याचा विचार करा. कौटुंबिक प्रश्‍न, मुलांचा आणि पालकांचा कोंडमारा याविषयी लिहिले जाणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

वैविध्य मांडण्यासाठी विभागवार संमेलने 

मराठी साहित्यात वैविध्य आहे. एकाच संमेलनात ते मांडता येणे शक्‍य नाही. त्यामुळे विभागवार संमेलने उदयास येत आहेत. कोकण विभाग साहित्य संमेलनाच्या धर्तीवर सीकेपी साहित्य संमेलन असावे, असा विचार आल्याने साहित्यिकांचा सहभाग वाढवण्यासाठी हे संमेलन घेण्यात आले आहे. ज्ञातीचे असले तरी सर्व साहित्यिकांचा यात समावेश आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने अशा संस्थांना सदस्यत्व देऊन त्यांचा साहित्य संमेलनात सहभाग करून घ्यावा याविषयीचा ठराव मांडण्यात येणार आहे, असे स्वागताध्यक्ष मोहन गुप्ते यांनी यांनी सांगितले. 

Web Title: Marathi News Mumbai News Literature Pravin Davane