शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चचे आज मनसे करणार स्वागत 

दीपा कदम
रविवार, 11 मार्च 2018

किसान सभेतर्फे विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईच्या वेशीवर पोहोचलेल्या 30-35 हजार शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चचे उद्या (ता. 11) मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वागत करण्यात येणार आहे.

मुंबई : किसान सभेतर्फे विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईच्या वेशीवर पोहोचलेल्या 30-35 हजार शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चचे उद्या (ता. 11) मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वागत करण्यात येणार आहे. मोर्चामध्ये सोमवारपर्यंत राज्यभरातून आणखी किमान 30 हजार शेतकरी सहभागी होणार आहेत. 

मोर्चाची सुरुवात किसान सभेने केली असली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे. हा कोणत्याही एका पक्षाचा मोर्चा नसल्याचे आवाहन किसान सभेचे सचिव कॉ. डॉ. अजित नवले यांनी "सकाळ'शी बोलताना केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला आहे. याआधी शिवसेनेनेही लॉंग मार्चला पाठिंबा जाहीर केला होता. 

डॉ. नवले यांनी सांगितले की, राज ठाकरेंनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी केवळ याच नव्हे; तर या नंतरच्याही शेतकऱ्यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे सागितले. 

हा मोर्चा 12 मार्चला मुंबईत विधानभवनावर धडकणार आहे. त्या वेळी शेतकरी विधानभवनाला घेराव घालतील. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी ठाणे आणि मुंबईकरांनीही शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. 

राज ठाकरेंच्या उपस्थितीची शक्‍यता 

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेतर्फे नाशिक-मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात आला आहे. तो आज भिवंडीत पोहोचला होता. उद्या ठाण्याला आनंदनगरला पोहोचणार आहे. तिथे या मोर्चामध्ये मनसेचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तो मुंबईच्या वेशीवर पोहोचेल त्यावेळी मनसेकडून स्वागत केले जाणार आहे. या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे.  

 
 

Web Title: Marathi News Mumbai News Maharashtra Navnirman Sena Farmers Long March