सरकारविरोधात लढण्याची मानसिकता तयार करा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई - मराठी शाळांना वाचविण्यासाठी लढणाऱ्या मराठी अभ्यास केंद्राने आता सरकारविरोधात एल्गार घोषित केला आहे. मराठी शाळांना वाचविण्यात सरकारला येणारे अपयश पाहता सरकारविरोधात लढण्याची मानसिकता तयार करावी, असे आवाहन मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी केले. मराठी शाळांच्या गंभीर प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 1 एप्रिल रोजी "एप्रिल फूल करणारे सरकार' या शीर्षकांतर्गत आंदोलन करण्यात येणार आहे.

मराठी शाळांच्या प्रश्‍नासंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत भविष्यातील कार्यवाहीबद्दल चर्चा करण्यात आली; त्या वेळी डॉ. दीपक पवार बोलत होते. मराठी शाळांना वाचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये. याउलट सकारात्मक ऊर्जेने या लढ्याला तोंड देण्यासाठी सरकारविरोधात लढण्याची मानसिकता ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. 2010 पासून सात वर्षे प्रक्रियेत असलेला मराठी शाळांचा बृहद्‌ आराखडा गेल्या मार्चमध्ये रद्द करण्यात आला. त्यामुळे मराठी शाळांच्या प्रश्‍नांसंदर्भात आरपारची लढाई लढावी लागेल, असे एकमत बैठकीत झाले. बृहद्‌ आराखड्यांतर्गत सर्व शैक्षणिक संस्थांना सोबत घेऊन न्यायालयीन लढा देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

Web Title: marathi news mumbai news marathi school government