राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्प : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

राष्ट्रपती फक्त त्या याकूब मेमनला फाशी देण्याच्या कामी आले, तेव्हा काय ते त्यांचे कार्य दिसले. ते वगळता देशाच्या कामी कधी आले आहेत का? त्यांचा काही फायदा झाला आहे का?

मुंबई : ''राष्ट्रपती म्हणजे निव्वळ रबर स्टॅम्प आहेत. त्यांचा देशातील नागरिकांना काही उपयोग आहे का? ज्यांचे सरकार, त्यांचा राष्ट्रपती. त्यामुळे या पदावर कोविंद बसो किंवा गोविंद, मला काय फरक पडतो,'' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडणुकीवर खरमरीत टीका केली. मुंबईत निवडक पत्रकारांशी ते बोलत होते. 

''आतापर्यंत किती राष्ट्रपती झाले ते आठवा आणि त्यांच्यामुळे काय झाले त्याचा विचार करा. त्या व्यक्तीचा देशातील नागरिकांना काही उपयोग आहे का, एवढाच सवाल आहे. राष्ट्रपती फक्त त्या याकूब मेमनला फाशी देण्याच्या कामी आले, तेव्हा काय ते त्यांचे कार्य दिसले. ते वगळता देशाच्या कामी कधी आले आहेत का? त्यांचा काही फायदा झाला आहे का? आज देशात इतके विषय सुरू आहेत, राष्ट्रपती म्हणून त्यांनी कधी त्यांची भूमिका जाहीर केली आहे का? केंद्र असो वा राज्य सरकार, अनेक प्रश्‍नांवर देशातील नागरिक त्यांना ईमेल करतात, पत्र पाठवतात, त्याचे पुढे काय होते. त्यांची कधी उत्तरे आल्याचे कळले आहे का? राष्ट्रपतिपद हा शब्दप्रयोग केला जातो; पण तो रबर स्टॅम्प आहे. ज्याचे सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे राष्ट्रपती,'' अशा शब्दांत ठाकरे यांनी राष्ट्रपतिपदाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. 

''आज शेतकरी आत्महत्येचा विषय असेल किंवा शेतकरी कर्जमाफी असेल, इतकी आंदोलने झाली, मराठा आरक्षणापासून इतर अनेक विषय झाले; पण राष्ट्रपतींचे त्यावर मत काय, ते कुठे येत नाही. असल्या विषयांमध्ये त्यांचे मत नाही, तर मग अशा राष्ट्रपतींचे काय करायचे? कोणी का बसेना, मला काय फरक पडतो,'' असे विधान करून राज ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडीवर खरमरीत टीकाही केली.

Web Title: marathi news mumbai news MNS Raj Thackray Ramnath Kovind Presidential Election