स्वयंरोजगाराद्वारे प्रगती साधणाऱ्या तरुणांबरोबर राष्ट्रपती साधणार संवाद 

मृणालिनी नानिवडेकर
गुरुवार, 11 जानेवारी 2018

मुंबई : मुद्रा बॅंक आणि बचत गटांद्वारे स्वयंरोजगार करून विविध समाजोपयोगी उपक्रमांत अग्रेसर असलेल्या तरुणांबरोबर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रविवारी (ता. 14) उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत संवाद साधणार आहेत. या उपक्रमानुसार ठाणे जिल्ह्यातील 70; तर मुंबई उपनगरातील 60 तरुण-तरुणींना आमंत्रण देण्यात आले आहे. 

देशात होतकरूंना मुद्रा बॅंकेतर्फे कर्ज देण्यात येते. आतापर्यंत एक लाख 78 हजार 313 कोटींचा वित्तपुरवठा मुद्रा बॅंकेच्या विविध उपक्रमांतर्गत करण्यात आला आहे. यातील 72 टक्‍के लाभार्थी महिला आहेत. गृहोपयोगी उपक्रम, शिवणकाम, चहा टपरी, कुटिरोद्योगापासून अगदी ब्युटी पार्लरपर्यंत छोट्या व्यवसायांना या योजनेंतर्गत कर्जे देण्यात आली आहेत.

उपलब्ध आकडेवारीनुसार कर्ज प्राप्त झालेल्या लाभार्थींत ओबीसी समाजातील 23 टक्‍के, अनुसूचित जातीतील 10.5 टक्‍के; तर अनुसूचित जमातीतील तीन टक्‍के मंडळींचा समावेश आहे. फंडिंग द अनफंडेड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेच्या प्रत्यक्ष लाभार्थीशी संवाद साधण्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सतत रस दाखवला आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत पुढे आलेल्या कोविंद यांना या वर्गाबद्दल ममत्व वाटते. आयसीएआरच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्‍ती झालेल्या खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची मुद्रा प्रकल्पांशी जवळीक आहे. त्यामुळेच मुंबई आणि ठाणे परिसरातील मुद्रा लाभार्थींशी संवाद साधण्यासाठी म्हाळगी प्रबोधिनीची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपतिपदी निवड झाल्यानंतर कोविंद या कार्यक्रमासाठी प्रथमच ठाणे जिल्ह्यात येणार आहेत.

Web Title: marathi news Mumbai News President Ramnath Kovind to interact with entrepreneurs