शिवसेनेची टॅब योजना फसली!; मुलांच्या पाठीवर दप्तराचे ओझे कायम

शर्मिला वाळुंज
रविवार, 30 जुलै 2017

अभ्यासापेक्षा विद्यार्थी टॅबमध्ये इतर गोष्टी पाहता बसायचे. त्यांना टॅब हाताळताही येत नसल्याने वारंवार नादुरुस्त होत असत. त्यामुळे आम्ही टॅब शाळेतच ठेवून घेतले. शाळेत आल्यानंतर विद्यार्थी त्याचा वापर करतात. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच शाळेने हा निर्णय घेतला. 
- माधुरी कुलकर्णी, मुख्याध्यापिका, स. वा. जोशी विद्यालय

ठाणे : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिवसेनेने दोन वर्षांपूर्वी काही शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप केले होते; मात्र विद्यार्थी या टॅबचा गैरवापरच अधिक करत असल्याचे निदर्शनास आले. परिणामी काही शाळांनी मुलांना शाळेत टॅब घेऊन येण्यास मनाई केली, तर काही शाळांनी टॅब शाळेतच ठेवून घेत शाळेत 'टॅबलॅब' सुरू केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके आणि वह्या घेऊन शाळेत यावे लागत असल्याने शिवसेनेची टॅब योजना फसल्याचे दिसते. 

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे; तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शिकविण्यात अधिक सुलभता यावी, यासाठी विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्याची योजना शिवसेनेने मांडली. मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने सर्वप्रथम हा प्रयोग राबविला. त्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहरातील काही शाळांतील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. यामुळे मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होईल, अशी अपेक्षा होती; मात्र विद्यार्थी टॅबचा दुरुपयोग करत असल्याने हे टॅब शाळांना डोकेदुखी ठरू लागले. त्यामुळे मागच्या वर्षी कल्याण-डोंबिवलीतील काही शाळांनी टॅब शाळेत आणण्यास बंदी घातली, तर काही शाळांनी टॅब मुलांना घरी न देता शाळेत ठेवून घेतले. शाळेत टॅबलॅब सुरू करून या टॅबमध्ये त्यांनी आठवी आणि नववीचा अभ्यासक्रम टाकला आहे; परंतु नववीचा अभ्यासक्रम बदलला असून, केवळ काही अभ्यासक्रमच यावर शिकविला जात असल्याचे शिक्षकांनी सांगितले. 

शिवसेनेचे दुर्लक्ष... 
टॅब शाळेत राहत असल्याने विद्यार्थ्यांना दररोज दप्तर घेऊन यावे लागत आहे. यामुळे त्यांच्या पाठीवरील ओझे काही कमी झाल्याचे दिसत नाही. निवडणुकीच्या तोंडावर केवळ स्वार्थासाठी सत्ताधारी शिवसेनेने शाळांमध्ये टॅबचे वाटप केले. त्यानंतर मात्र हे टॅब सुरळीत सुरू आहेत की नाहीत, विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होत आहे की नाही, याकडे शिवसेनेने लक्ष दिले नसल्याचे चित्र आहे. 

दरम्यान, 2015 मध्ये शहरातील काही शाळांमधील आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आले होते. शिवसेनेची ती संकल्पना होती आणि ती राबविली गेली, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

काय होता हेतू? 

  • मुलांचे दप्तराचे ओझे कमी करणे 
  • चित्र किंवा दृक्‌श्राव्याद्वारे शिक्षण देणे 
  • आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण देणे 
  • पहिल्या टप्प्यात सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब देणे 
  • दुसऱ्या टप्प्यात पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देणे 
Web Title: marathi news mumbai news School Education Sharmila Walunj