हवेत विरले शिवसेनेचे "भवन'गीत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

मुंबई - विविध समाज घटकांची व्होटबॅंक पक्की करण्यासाठी शिवसेनेच्या "भवन' उभारण्याच्या घोषणा पोकळच ठरल्या. महानगरपालिकेचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर होण्याची वेळ आली तरी शिवसेनेने जाहीर केलेले भवन कागदावरच राहिले आहेत. 

मुंबई - विविध समाज घटकांची व्होटबॅंक पक्की करण्यासाठी शिवसेनेच्या "भवन' उभारण्याच्या घोषणा पोकळच ठरल्या. महानगरपालिकेचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर होण्याची वेळ आली तरी शिवसेनेने जाहीर केलेले भवन कागदावरच राहिले आहेत. 

महापालिकेच्या 2017-18 च्या अर्थसंकल्पात शिवसेनेने माथाडी भवन, संत रोहिदास भवन, डबेवाला भवन, आगरी भवन, याचबरोबर क्रांतिवीर लहूजी साळवे स्मारक, भागोजी किर स्मारक आदी वास्तू उभारण्याची घोषणा केली होती. मुंबईकरांसाठी आरोग्य विमा देण्यासाठीही अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली होती. मात्र, यातील एकही काम शिवसेनेच्या धुरिणांना वर्षभरात पूर्ण करता आले नाही. व्होटबॅंक पक्की करण्यासाठी शिवसेनेने या प्रकल्पांबरोबरच इतर सर्व प्रकल्पांसाठी सुमारे 150 कोटी रुपयांची विशेष तरतूद केली होती. त्यासाठी पालिका प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात फेरफार करण्यात आला होता. 

मुंबई पालिकेचा 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी (2 फेब्रुवारी) आयुक्त अजोय मेहता स्थायी समितीला सादर करतील. शिवसेनेने 2017-18 च्या अर्थसंकल्पात नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटीचा निधी देण्यासह 41 विविध तरतुदी केल्या होत्या. मात्र, यातील दहा प्रकल्पही अजून सुरू होऊ शकले नाहीत. महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक, तरुण, विद्यार्थी, बेरोजगार यांच्यासाठी विविध योजनांची घोषणा शिवसेनेने केली होती. मात्र, त्या घोषणाही हवेत विरल्या आहेत. 

थिम पार्कही दूरच 
महालक्ष्मी येथील रेसकोर्सचा भूखंड ताब्यात घेऊन त्यावर थिम पार्क उभारण्याचा ठराव महानगरपालिकेने राज्य सरकारकडे चार वर्षांपूर्वी पाठवला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा ड्रीम प्रोजेक्‍ट आहे. मात्र, त्यासाठी शिवसेनेने अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद करून घेतली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पालाही परवानगी दिली नसल्याने ही तरतूदही वाया गेली आहे. दोन वर्षांपासून शिवसेना या थिम पार्कसाठी तरतूद करत आहे. 

मराठी भाषा 
भाषेच्या संवर्धनासाठी विविध तरतुदी करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर मराठी रंगभूमीचा इतिहास जिवंत करण्यासाठी रंगभूमी भवनही बांधण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. त्यासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली; तर मराठी भाषा संवर्धनासाठी मराठी प्रशिक्षण वर्गासाठी 10 लाख, मराठी भाषा संवर्धनासाठी पीएचडी करणाऱ्यांना शिष्यवृत्ती म्हणून योजना तयार करण्यात येणार होती. त्यासाठी एक लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती; तर ई वाचनालय सुरू करण्यासाठीही तरतूद करण्यात आली होती. मात्र, यातील एकही तरतूद प्रत्यक्षात उतरलेली नाही. 

कागदावर राहिलेल्या तरतुदी 
- बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना - 50 लाख 
- माथाडी भवन - 50 लाख 
- डबेवाला भवन - 50 लाख 
- प्रभादेवी येथे आगरी भवन - एक लाख 
- संत रोहिदास भवन - एक लाख 
- क्रांतिवीर लहूजी साळवे स्मारक - पाच लाख 
- कै. भागोजी किर स्मारक - एक लाख 
- देशाच्या स्वातंत्र्याची गाथा सांगणारे दालन - 50 लाख 
- महापालिकेचे फुटबॉल आणि क्रिकेट अकादमी - पाच लाख 
- कौशल्य आणि व्यावसायभिमुख प्रशिक्षणासाठी - 50 लाख 
- उद्यानांमध्ये बालकांसाठी फिडिंग रूम - 50 लाख 
- प्रत्येक विभागात पाळणाघर - 25 लाख 
- मधुमेहावरील उपचारांसाठी रुग्णालय - 10 लाख

Web Title: marathi news mumbai news shiv sena