'स्मार्ट ठाणे'साठी अधिकाऱ्यांची धावपळ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

केंद्रातून स्वच्छ सर्वेक्षणासाठी दिल्लीच्या पथकाने आजपासून शहरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यास सुरुवात केली. त्या वेळी त्यांच्या पाहणीच्या ठिकाणांचा स्वच्छतेचा आढावा वारंवार घेण्यात येत होता. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या तुटलेल्या पायऱ्या काही तास आधी बांधण्याची कामगिरीही प्रशासनाने केल्याचे समजते.

ठाणे : "स्मार्ट ठाणे'साठी देशात स्वच्छतेच्या विभागात आघाडी घेण्यासाठी ठाणे महापालिका विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारकडून शहराच्या स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पथकाच्या आगमनानंतर अनेक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज धावपळ सुरू होती. या धावपळीमुळे अनेक परिसर नेहमीपेक्षा अधिक चकाचक झाल्याचा अनुभव ठाणेकरांना यानिमित्ताने आला. 

केंद्रातून स्वच्छ सर्वेक्षणासाठी दिल्लीच्या पथकाने आजपासून शहरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यास सुरुवात केली. त्या वेळी त्यांच्या पाहणीच्या ठिकाणांचा स्वच्छतेचा आढावा वारंवार घेण्यात येत होता. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या तुटलेल्या पायऱ्या काही तास आधी बांधण्याची कामगिरीही प्रशासनाने केल्याचे समजते. रविवार आणि सोमवार असे आणखी दोन दिवस दिल्लीचे पथक प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. त्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत ठाणे शहराची गुणांक ठरणार आहे.

प्रत्यक्ष पाहणीसाठी दोन पथके तयार केली होती. यामध्ये एक पथकाने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीची पाहणी केली, तर दुसऱ्या पथकाने वागळे इस्टेट भागात जाऊन झोपडपट्टी विभागाची पाहणी केली. सकाळी उथळसरमध्ये आझाद नगर या झोपडपट्टी भागाचीही पाहणी केली. त्या वेळी तेथील स्वच्छतेचा आढावा पथकाने घेतला. 

अधिकाऱ्यांचे फोनवर नियोजन 

कळव्यातील ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या परिसरात जाऊन दिल्लीच्या पथकाने पाहणी केली. या पथकाने सार्वजनिक शौचालयाची पाहणी आतमध्ये जाऊन केली. आज दोन वेळा संपूर्ण हॉस्पिटलच्या परिसराची स्वच्छता केली होती. वागळे इस्टेटमध्ये झोपडपट्टी भागाची तसेच औद्योगिक परिसराची पाहणी केली.

प्रत्यक्ष पाहणीवेळी अधिकाऱ्यांचे फोनवर नियोजन सुरू होते. ज्या ठिकाणी दिल्लीचे पथक पाहणी करणार होते, त्याआधीच पालिका अधिकारी फोनवरून येथील नियोजन करत होते. 

Web Title: Marathi News Mumbai News Smart Thane Official Delhi Department