सोशल साईट्‌सवर बदनामी करणारी महिला अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

सोशल साईट्‌सवरील बनावट खात्याद्वारे अश्‍लील संदेश पाठवून बदनामी करून तब्बल 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या 28 वर्षांच्या शबनमला (नाव बदललेले आहे) एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. चार दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. 

नवी मुंबई : सोशल साईट्‌सवरील बनावट खात्याद्वारे अश्‍लील संदेश पाठवून बदनामी करून तब्बल 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या 28 वर्षांच्या शबनमला (नाव बदललेले आहे) एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. चार दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. 

शबनम आणि पीडित व्यक्तीची काही महिन्यांपूर्वी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले; मात्र पीडित व्यक्तीने शबनमला विवाहित असून हे नाते पुढे नेता येणार नसल्याचे सांगितले. काही दिवसांनंतर विरह सहन न झालेल्या शबनमने पीडित व्यक्तीच्या पत्नीला फोनवरून एकत्र राहण्याचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आरोपी शबनमने पीडित व्यक्तीचे सोशल साईट्‌सवर बनावट खाते तयार केले. त्यावरून त्याच्या संबंधित नातेवाईक आणि ओळखीच्या मित्रांना अश्‍लील संदेश पाठवण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे संतापलेल्या व्यक्तीने शबनमला ही बदनामी थांबवण्यास सांगितले. त्या बदल्यात 50 लाखांची मागणी केली. ही रक्कम देऊ शकत नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर शबनमने त्याची पत्नी काम करत असलेल्या शाळेतील पालक आणि शिक्षकांना अश्‍लील संदेश पाठवण्यास सुरवात केली. 

अखेर पीडित व्यक्तीच्या पत्नीने एनआरआय पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार केली. पोलिसांनी तयार केलेल्या सोशल साईट्‌सवरील बनावट खात्याच्या आयपी ऍड्रेसवरून शबनमला शोधून काढले. शबनमला ताब्यात घेतल्यानंतर तिने तयार केलेले सोशल साईट्‌सचे खाते आणि 50 लाखांसाठी केलेला ई-मेल पोलिसांना तपासात सापडला. याप्रकरणी शबनमला चार दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर जामिनावर सुटका करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता जाधव यांनी सांगितले. 

 

 

Web Title: Marathi News Mumbai News Social Site Woman Arrested