...आणि उल्हासनगरातील स्मशानभूमीत ओशाळली माणुसकी

cremation
cremation

उल्हासनगर : नेरळमधील वृद्धाश्रमात राहणाऱ्या 80 वर्षीय वयोवृद्ध अनाथ महिलेचा उल्हासनगरात आणताना वाटेतच मृत्यू झाला. मात्र स्मशानभूमीत सरपणाचे 1600 भरल्याशिवाय अंतिमसंस्कारास नकार देण्यात आला. रुग्णमित्राने धावाधाव करून फोनाफोनी केल्यावर पालिकेच्या अधिकाऱ्याने उद्या पालिकेत येऊन पैसे घेऊन जा असे आश्वासन दिल्यावर ती महिला अखेर अनंतात विलीन झाली. वयोवृद्ध महिलेची मृत्यूपश्चात हेळसांड झाल्याची ही माणुसकी ओशाळणारी ही घटना मासमीडियावर चव्हाट्यावर आली आहे. ती पाहता प्रत्येक स्मशानभूमीत विद्युत दाहीनी असावी अशी मागणी या घटनेचे साक्षीदार शिवसेना अपंग सहाय्य सेना कल्याण जिल्हा अध्यक्ष, रुग्णमित्र भरत खरे यांनी केली आहे.

31 जानेवारीच्या रात्री नेरळ मधील साळोखे आनंद वृद्धाश्रमात राहणाऱ्या 80 वर्षीय अनाथ किंबहुना निराधार हिराबाई लबळे यांची प्रकृती खालावली.वृद्धाश्रमातील एक कर्मचारी त्यांना रिक्षातून उल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात घेऊन येत असतानाच हिराबाईचा वाटेतच मृत्यू झाला. तिचे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.मात्र ती अनाथ नातलग नसल्याने अंतीमसंस्कार करणार कसा?अशी खंत कर्मचाऱ्याने व्यक्त केली.सर्जन डॉ.शशिकांत दोडे यांनी हा प्रकार रात्रीच शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे कल्याण लोकसभा अध्यक्ष तथा रुग्णमित्र भरत खरे यांना फोन करून कळवला. खरे यांनी महापालिका परिवहन विभागाचे व्यवस्थापक यशवंत सगळे याना फोन करून पालिकेचा रथ पाठविण्याची विनंती केली त्यांनी लागलीच ती व्यवस्था केली.खरे देखील रुग्णालयात गेले.तिथे महिला पोलीस मोरे ,मयत वृद्धेची मानलेली पुतणी आणि आश्रमात राहत असलेले 70 वर्षीय वृद्ध पोस्ट मार्टेम खोली समोर ताटकळत उभे होते. त्या प्रेताला गाडीत टाकण्यासाठी माणूस नव्हता.अशा वेळी खरे आणि  विशाल खंडागळे यांनी मदत केली. शवविच्छेदन करणारा खर्ची मागू लागला.खरे यांनी 30 रुपये दिले. पण तो अधिक मागणी करू लागल्यावर,ही महिला निराधार असल्याचे खरे यांनी त्याला सांगितले.

मृतदेहाला शांतीनगर समशान भूमीत नेल्यावर सरपणाचे 1600 रुपये भरा अन्यथा अंत्यसंस्कार करणार नाही, प्रेत वापस घेऊन जा, असा पवित्रा कर्मचारी यांनी घेतला.सरपण मोफत आहेत.असे खरे यांनी कर्मचाऱ्याला पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर नगरसेवकाचे पत्र आणा, ट्रस्टी ला फोन लावा.अशी ताठर भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्यावर खरे यांनी ट्रस्टी ला फोन लावला. ट्रस्टीने मी जेवण करत आहे.अर्ध्या  तासा नंतर फोन लावा. मग बघू असे म्हणून फोन ठेवला.

खरे यांनी हा प्रकार यशवंत सगळे याना फोन वरून सांगितला.सगळे यांनी सदर प्रेत हे निराधार आहे त्याचा विधी करून टाका असे म्हटल्यावर आम्ही खिशातून पैसे भरू का?असे प्रतिउत्तर त्यांना मिळाले. त्यात तब्बल एक तास लोटला. शेवटी यशवंत सगळे यांनी त्यांना सांगितले की मी 1600 रुपये भरतो सकाळी माझया ऑफिस् ला पावती घेऊन या आणि पैसे घेऊन जा.त्यानंतर त्या गाडीतून प्रेत बाहेर काढताना कर्मचारी ओरडत होते. सरपण आणि प्रेत गाडीतून बाहेर काढायला माणसे घेऊन या.आम्ही हे करणार नाही. खरे यांनी बाहेर येऊन नागरिकांना मदतीची हाक दिली.आणि स्मशानभूमीत मृत्यूपश्चात हेळसांड झालेल्या अनाथ निराधार हिराबाई लबळे अनंतात विलीन झाल्या.

"ते सरपणाचे रुपये घेऊन गेले"
वाहन व्यवस्थापक यशवंत सगळे यांनी पैसे अदा करण्याचा शब्द दिल्यानंतर शांतीनगर स्मशानभूमीत हिराबाई वर अंतीमसंस्कार करण्यात आले.आज दुपारी ते कर्मचारी सरपणाचे रुपये घेऊन गेले.त्यांनी पावती देखील दिली.रस्त्यावर मृत्युमुखी पडलेल्या भिकाऱ्यांचा अंतीमसंस्कार पालिकेच्या वतीने केला जातो.पण हिराबाई ह्या वृद्धाश्रमातील होत्या.याशिवाय त्या शहराबाहेरील असल्याने त्यांच्यावर मोफत अंतीमसंस्कार करता येत नव्हते.त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी सरपणाचे रुपये मागितले.ते नियमात असल्याची माहिती यशवंत सगळे यांनी दिली.

"ट्रस्टीने ह्युमन अँगल ठेवावा"
हिराबाई सोबत घडलेला मृत्यूपश्चात नंतरचा प्रसंग मन हेलावून सोडणारा आहे.त्या शहरातील नव्हत्या.पण अनाथ निराधार असल्याने त्यांच्या अंतीमसंस्कारासाठी सरपण मिळायला हवी होती.अशा वेळी ट्रस्टीने ह्युमन अँगल ठेवावा.तशा सूचना स्मशानभूमी कर्मचाऱ्यांना द्याव्यात.अशी प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी व्यक्त केली.त्यांनी रात्री उशिरापर्यंत धावाधाव करणारे भरत खरे यांचे कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com