अमित शहांना दोषमुक्तीविरोधात वकील संघटनेची याचिका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मुंबई : गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक खटल्यामधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांना दोषमुक्त करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बॉम्बे लॉयर्स असोसिएशन या वकिलांच्या संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात आज याचिका केली आहे. 

मुंबई : गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक खटल्यामधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांना दोषमुक्त करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बॉम्बे लॉयर्स असोसिएशन या वकिलांच्या संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात आज याचिका केली आहे. 

सोहराबुद्दीन चमकमकीच्या खटल्यामध्ये अमित शहा प्रमुख आरोपी होते. मात्र, डिसेंबर 2014 मध्ये सीबीआय विशेष न्यायालयाने त्यांना पुरेशा पुराव्याअभावी दोषमुक्त केले. या विरोधात सीबीआयने वरच्या न्यायालयात अद्याप अपील याचिका केली नाही. सीबीआयच्या या भूमिकेबाबत याचिकादार संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. सीबीआयचा हा निर्णय बेकायदा, पक्षपाती आणि जाणीवपूर्वक घेतलेला आहे. त्यामुळे सीबीआयने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करावे, अशी मागणी याचिकेत संघटनेने केली आहे. 

शहा यांच्याबरोबर गुजरात आणि राजस्थानमधील बड्या पोलिस अधिकाऱ्यांनाही विशेष न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. अशाप्रकारे निवडक आरोपींच्या विरोधात अपील न करण्याचा निर्णय जनहितासाठी काम करणाऱ्या यंत्रणेकडून होणे अवैध आणि विश्‍वासाला तडा देणारे आहे, असे याचिकादारांनी म्हटले आहे. 

दरम्यान, सोहराबुद्दीन शेख चकमक खटल्याची विशेष न्यायालयातील सुनावणीचे वृत्तांकन करण्यास प्रसिद्धिमाध्यमांना बंदी घातली आहे. या विरोधात पत्रकारांनी केलेल्या याचिकेवर आज न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने सीबीआय आणि या खटल्यातील आरोपींना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहे. पुढील सुनावणी 23 जानेवारीला आहे.

Web Title: marathi news mumbai News sohrabuddin case Amit Shah Mumbai High Court