बंद पडलेल्या घड्याळ आणि इंडीकेटर दुरुस्तीच्या कामाला सुरवात

रविंद्र खरात
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

कल्याण : कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे स्थानकादरम्यान प्रवाशांना प्रवास करताना प्रतिदिन विविध समस्यांना सामोरे जावे लागत असताना अनेक रेल्वे स्थानकात जीपीएस घड्याळे व इंडीकेटर बंद असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता, याबाबत प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार या रेल्वे स्थानकातील इंडिकेटर आणि घड्याळ दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून जानेवारी 2018 अखेरीस काम पूर्ण होण्याची शक्यता असून त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे स्थानकादरम्यान प्रति दिन लोकलने 10 लाखाहुन अधिक प्रवासी प्रवास करतात. यामुळे रेल्वेला कोट्यावधी रुपयांचा महसूल ही मिळतो मात्र प्रवाशांना रेल्वे प्रशासन काय सुविधा देते हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रतिदिन या ना त्या कारणाने लोकल सेवा विस्कळीत होण्याचे प्रकार वाढत असून त्यात कल्याण ते कसारा, आणि कल्याण ते कर्जत रेल्वे स्थानकातील इंडिकेटर आणि घड्याळ चुकीची वेळ आणि माहिती देत असताना काही बंद अवस्थेत असल्याने प्रवास करताना प्रवाशांची तारांबळ उडते तर काही वेळा लोकल सुटल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

यासंबंधी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली होती, त्याची दखल घेत मध्य रेल्वे मुख्य व्यवस्थापक तक्रार निवारण कक्षाचे सेक्रटरी एस. एम. केळकर यांनी प्रवासी संघटनेला लेखी उत्तर दिले असून त्यात त्यांनी कल्याण पुढील शहाड, आंबिवली, टिटवाळा, कसारा, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूर, शेलू, आणि भिवपुरी या रेल्वे स्थानकातील बंद पडलेल्या इंडीकेटर बदली करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यानंतर कसारा व कर्जत मार्गावरील अन्य रेल्वे स्थानकातील इंडीकेटर बदली केले जातील व सध्या सर्व इंडीकेटरची दुरूस्ती व नियंञण विभागाकडून नियमित ठेवले जाते जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होऊ नये याशिवाय सर्व फलाटांवर सिमेंटचे काम सुरू आहे व निधीची तरतुद होताच आणखी सुधारणा केल्या जातील त्याचप्रमाणे जुन्या पादाचारी पुलांची दुरुस्ती हाती घेतली असून कल्याण, आंबिवली व कसारा येथील दुरूस्ती झाली आहे. ही सर्व काम जानेवारी 2018 अखेरीस करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन प्रवासी संघटनेला दिले आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

रोजच कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे प्रवास कठीण झाला आहे, अनेक सुविधांबाबत प्रवासी संघटनांमार्फत पाठपुरावा करत असून बंद पडलेल्या घड्याळ आणि इंडीकेटर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केल्याने रेल्वे प्रशासनाचे आभार मात्र याबाबत सातत्याने सर्व रेल्वे स्थानकात पाहणी करावी अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी केली आहे.

Web Title: Marathi news mumbai news start of watch and indicators repairing