ठाणे स्थानकात फुकट्यांकडून तब्बल 57 लाखांची दंडवसुली

Representational image
Representational image

ठाणे:  “आठशे खिडक्या नऊशे दारं” अशी अवस्था असलेल्या मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाश्यांना ये-जा करण्यासाठी तब्बल 19 अधिकृत व खुश्कीचे मार्ग आहेत. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्याचे चांगलेच फावत असते. तरीही रेल्वेच्या 18 तिकीट तपासनिसांनी (टीसी) अशा फुकट्याना चांगलाच धडा शिकवला आहे. त्यानुसार मागील 15 महिन्यात 23 हजार 583 फुकट्या प्रवाश्याना पकडून तब्बल 57 लाखांची दंडवसुली करून विक्रम नोंदवला आहे.    

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सुमारे 7 लाख प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे ठाणे स्थानक नेहमीच गजबलेले असते. ठाणे स्थानकात एकूण 11 फलाट असून येथून मध्य रेल्वे मार्गावर आणि वाशी-पनवेलसाठी ट्रान्सहार्बर मार्गावर लोकल धावत असतात. सतत प्रवाश्यांचा राबता असलेल्या या स्थानकातून प्रवाश्यांना ये-जा करण्यासाठी दोन जुने आणि दोन नवीन असे चार पादचारी रेल्वे पूल आहेत. किंबहुना तुलनेने मुबलक तिकीट खिडक्या तसेच, तिकीट व्हेडिंग मशीन्सदेखील स्थानकात बसवण्यात आलेल्या आहेत. तरीही अनेक फुकटे प्रवाशी स्थानकातून बाहेर पडण्यासाठी अधिकृत आणि खुश्कीच्या मार्गांचा वापर करतात. हीच बाब हेरुन मध्य रेल्वे प्रशासनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाणिज्य विभागाच्या मदतीने तीन शिफ्टमध्ये 7 महिला टीसीसह 18 जणांच्या चमूने अशा फुकट्या प्रवाश्यांची पुरती कोंडी करून वारंवार तपासणी मोहीम राबवली. त्यानुसार मागील 15 महिन्यात रेल्वेतील फुकट्याना चांगलीच अद्दल घडली आहे.एप्रिल 2016 ते मार्च 2017 या वर्षभराच्या कालावधीत 18 हजार 258 विनातिकीट प्रवाश्याकडून सुमारे 43 लाख 63 हजार 382 रुपये दंड वसूल केला आहे.तर,यावर्षी एप्रिलमध्ये 1,987 प्रवाश्याकडून 5 लाख 6 हजार 430,मे महिन्यात 1,685 जणांकडून 4 लाख 34 हजार 880 आणि जून अखेरपर्यंत 1,653 जणाकडून 3 लाख 95 हजार 855 रुपये दंड वसूल केला.अशी माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी  दिली.

कुठल्याही सार्वजनिक वाहतूक उपक्रमातून विनातिकीट प्रवास करणे सामाजिक गुन्हा आहे.यासाठी दंडात्मक कारवाईसह कोठडीत रवानगी केली जाते.तेव्हा रेल्वेच्या विकासासाठी पर्यायाने देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी तिकीट काढून प्रवास करणे उचित.असे मत मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com