ठाण्यात सफाई कामगारांना पाडवा गोड ; आवास योजनेतील घरे मिळणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

ठाणे महापालिकेत 25 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या पात्र सफाई कामगार आणि मृतांच्या वारसांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत मोफत सदनिका मिळाल्या आहेत. याचा सुमारे 56 कुटुंबांना लाभ होणार आहे. 

ठाणे : ठाणे महापालिकेत 25 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या पात्र सफाई कामगार आणि मृतांच्या वारसांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत मोफत सदनिका मिळाल्या आहेत. याचा सुमारे 56 कुटुंबांना लाभ होणार आहे. 

हक्काची घरे या सफाई कामगारांना लवकरच मिळणार असल्याने यंदाचा गुढीपाडवा त्यांच्यासाठी नक्कीच "गोड' ठरला आहे. नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार ठाण्यात ही योजना राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेऊन असून लाभार्थींची बायोमेट्रिक नोंदणी केली होती. त्यानंतर 7 जानेवारी 2015 रोजी 274 लाभार्थींची सोडत काढून त्यांना भायंदर पाडा आणि माजीवडा हद्दीत सदनिका देण्याचे जाहीर केले होते. भायंदर पाडा येथे तीन; तर माजिवडा हद्दीत राबोडीतील पंचगंगा गृहसंकुलात सहामजली इमारत बांधली होती. 

भायंदर पाडा इमारतीतील सदनिका लाभार्थींना वाटप केल्या होत्या; मात्र 56 सदनिका असलेली राबोडीतील इमारत गेली तीन वषे पडून होती. त्यामुळे वंचित सफाई कामगार आणि वारसदार हवालदिल झाले होते. याप्रकरणी कर्मचारी आणि वारसदार यांनी अखेर भाजपचे आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेऊन साकडे घातले.

केळकर यांनी संबंधित प्रशासनाशी पाठपुरावा करून हे काम मार्गी लावले. त्यामुळे लवकरच ही कुटुंबे त्यांच्या हक्काच्या घरांत जाणार आहेत. 

 

Web Title: Marathi News Mumbai News Thane News Sanitary Workers will get Home