मुंबई: कारवाई चुकवण्यासाठी गटारात लपवला भाजीपाला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

फेरीवाल्यांनी भाजीपाला, फळे तसेच इतर साहित्यही नाल्यात लपवले होते. पालिकेच्या पथकाने हे सामान जप्त केले. अशी कारवाई पालिका वारंवार करत असते; मात्र फेरीवाल्यांवर गुन्हा होत नाही; परंतु गटारात लपवलेला भाजीपाला नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरू शकतो, त्यामुळे पालिकेने त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 

मुंबई : मुंबई महापालिकेच्या पथकाची कारवाई टाळण्यासाठी फेरीवाल्यांनी भाज्यांच्या गोण्या चक्क नाल्यात लपवल्याची घटना वाकोल्यातील नेहरूनगर परिसरात उघडकीस आली आहे. फेरीवाले गटारातून भाज्या काढत असल्याचा व्हिडीओ शुक्रवारी सकाळी व्हायरल झाला. त्यानंतर पालिकेने हा माल जप्त करत फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दादर येथील केशवसुत उड्डाणपुलाजवळील फेरीवालेही जलवाहिन्यांच्या मॅनहोलमध्ये सामान लपवून ठेवत असल्याचे उघड झाले होते. 

फेरीवाल्यांनी भाजीपाला, फळे तसेच इतर साहित्यही नाल्यात लपवले होते. पालिकेच्या पथकाने हे सामान जप्त केले. अशी कारवाई पालिका वारंवार करत असते; मात्र फेरीवाल्यांवर गुन्हा होत नाही; परंतु गटारात लपवलेला भाजीपाला नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरू शकतो, त्यामुळे पालिकेने त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 

नेहरूनगर येथील रस्त्यांची कामे सुरू आहेत. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी हा नाला बांधण्यात आला आहे. त्यात हा भाजीपाला लपवला जात होता. तेथे फेरीवाल्यांनी बसू नये, यासाठी पालिरका वारंवार कारवाई करते. आजही तशी कारवाई करण्यात आली. नाल्यात भाजीपाला लपवल्याबद्दल सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी फेरीवाल्यांवर गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. 
- अलका ससाणे, सहायक आयुक्त, एच-पूर्व विभाग, मुंबई पालिका 

Web Title: Marathi news Mumbai news vegetables in drainage