पोलिस मित्रांची कामगिरी कौतुकास्पद

संजीत वायंगणकर 
रविवार, 7 जानेवारी 2018

डोंबिवली - नुकताच समोर आलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये डोंबिवलीत पोलिस मित्र पोलिसांना मदत करीत असतानाच मानवतेच्या दृष्टीने उल्लेखनीय काम करत असल्याने सर्व थरातून त्यांचे कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वी पूर्वेकडे भाजी मार्केट परिसरात मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास तीस-बत्तीस वयाचा एक तरुण रक्त आणि मातीने माखलेल्या जखमी अवस्थेत बेशुद्ध पडला आहे असे पोलिस मित्र तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत मागविली.

डोंबिवली - नुकताच समोर आलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये डोंबिवलीत पोलिस मित्र पोलिसांना मदत करीत असतानाच मानवतेच्या दृष्टीने उल्लेखनीय काम करत असल्याने सर्व थरातून त्यांचे कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वी पूर्वेकडे भाजी मार्केट परिसरात मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास तीस-बत्तीस वयाचा एक तरुण रक्त आणि मातीने माखलेल्या जखमी अवस्थेत बेशुद्ध पडला आहे असे पोलिस मित्र तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत मागविली. पोलिस मित्र शैलेश जोशी, लखन नलावडे, स्वप्नील कोलार, राजू राजपूत या तरूणांनी पोलिस नाईक विकास माळी यांच्या सहकार्याने बेशुद्ध पडलेल्या त्या अनोळखी जखमी तरुणाला रुग्णवाहिकेतून पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. तेथून डॉक्टरांनी या तरुणाला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात हलविण्यास सांगितले. तेथील डॉक्टरांनी या तरुणावर उपचार सुरू केले. 

या तरुणाच्या पायाला मोठी जखम होऊन गँगरीन होऊन रक्त वाहत होते. अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे हा तरुण बेशुध्द पडला होता. डॉक्टरांनी या तरुणावर उपचार करून काही वेळाने शुद्धीवर आला असता त्याने पोलिसांना आपली माहिती दिली. राजू अजय गांधील (38) असे या तरूणाचे नाव असून तो नेरुळ येथे राहणारा आहे. राजू हा डोंबिवलीच्या भाजी मार्केटमध्ये भाजी विकून आपली उपजीविका करतो. स्वतःच्या कुटुंबाबाबत त्याने पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. डोंबिवली पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविला. राजूवर वेळीच उपचार झाल्यामुळे तो आता बरा झाला आहे. त्याने याबाबत डोंबिवली पोलिस आणि पोलिस मित्रांचे आभार मानले आहेत.

रस्त्यावर पडलेली जखमी व्यक्ती कोण आहे, कुठली आहे, याचा आम्ही कधीही विचार करत नाही. बेशुद्धावस्थेत पडलेल्या जखमी तरुणाच्याबाबत आम्ही कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही. प्रथम त्याला उपचाराची गरज होती, या उद्धेशाने त्या तरुणाला वेळीच रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर औषधोपचार सुरू होऊन त्याचे प्राण वाचू शकलो, यातच आम्हाला समाधान असल्याचे पोलिस मित्र शैलेश जोशी याने आपले मत व्यक्त केले.

दुसऱ्या घटनेत बेवारसांचे पोलिस मित्र हेच वारस हा प्रत्यय आला. ठाकुर्ली परिसरात अंकुर सोसायटीमध्ये राहणारा गृहस्थ सुमारे तीन दिवसांपूर्वी मयत झाला होता. तो घरात एकटाच राहत होता. त्यामुळे दुर्गंधी सुटल्यानंतर इमारतीतील रहिवाश्यांच्या हा प्रकार लक्षात आला. या गृहस्थाचा अकस्मात मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह पूर्णपणे सडला होता. त्यामुळे सोसायटीतील रहिवासी किंवा इतर कोणीही त्याचा मृतदेह उचलण्यास पोलिसांना मदत करण्यास तयार नव्हते. हे लक्षात येताच याच पोलीस मित्र शैलेश जोशी व त्याच्या सहकाऱ्यांनी कर्तव्यभावनेतून हा मृतदेह उचलून उत्तरीय तपासणीकरिता पालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात नेला व माणुसकीचे दर्शन घडविले.

 

Web Title: marathi news mumbai police mitra help people