राष्ट्रवादी, भाजप-सेनेशी युती नाही : प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

भीमा कोरेगाव येथील दंगलीचे सूत्रधार असलेले मिलिंद एकबोटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस वाचवित असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांच्यासोबत युती करणार नाही.

-  प्रकाश आंबेडकर

मुंबई : भीमा कोरेगाव येथील दंगलीचे सूत्रधार असलेले मिलिंद एकबोटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस वाचवित असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांच्यासोबत युती करणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. काँग्रेसने भूमिका स्पष्ट केल्यास आम्ही आमची त्याबाबतची भूमिका स्पष्ट करू, असेही त्यांनी सांगितले. 

भारिप बहुजन महासंघाचा राज्यव्यापी मेळावा आज दादर येथील आंबेडकर भवनात पार पडला. मेळाव्यानंतर आंबेडकर पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, एकबोटे हे भाजपसोबत होते. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पाठिशी घालीत आहे. सलोखा राखण्याऐवजी दंगलीतून राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांसोबत न जाता डाव्या पक्षांना सोबत घेण्याची आमची भूमिका आहे. 

काँग्रेससोबत जाणार काय या प्रश्‍नावर ते म्हणाले की, काँग्रेसने आधी आपली भुमिका जाहिर करावी, त्यानंतर आम्ही आमची भुमिका जाहीर करू. 

शिवसेनेबरोबर युती होवू शकेल काय असे विचारताच, आंबेडकर म्हणाले, आधी त्यांनी भाजपसोबतची युती तोडावी, ते भाजपसोबत आहेत. ते भाजपला मदतच करीत आहेत. ते भाजपपासून वेगळे झाल्यास मगच त्याबाबत बोलता येईल. 

राज्यात काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असो किंवा भाजप-शिवसेनेचे, एकबोटेसारख्यांना कुणी हात लावू शकत नाही, असेही ते म्हणाले, न्यायालयीन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय एकबोटे यांना अटक होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र मुख्यमंत्रीसुध्दा एकबोटे यांना पाठीशी घालीत असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने बनावट आदिवासी प्रमाणपत्राद्वारे सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्यांविरूध्द निलंबाची कारवाई करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. मात्र या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आहे त्याच ठिकाणी सर्वसाधारण जागांवर ठेवावे. त्यांना पदोन्नती देवू नये. त्यांच्या निवृत्तीनंतर आदिवसी उमेदवारांची त्यांच्या जागी, राखीव जागांवर भरती करावी, असे मतही आंबेडकर यांनी मांडले. 
 

Web Title: marathi news mumbai prakash ambedkar sharad pawar