एक स्थानक महिला कर्मचाऱ्यांकडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

मध्य रेल्वेने सर्व विभागांतील प्रत्येकी एक स्थानक महिला कर्मचारी चालवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक महिला दिनी मध्य रेल्वेने 'डेक्कन क्वीन'मध्ये संपूर्ण महिला कर्मचारी नेमण्याचे नियोजन केले आहे.

मुंबई - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मध्य रेल्वेने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेने सर्व विभागांतील प्रत्येकी एक स्थानक महिला कर्मचारी चालवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या सर्व विभागांतील एका स्थानकात संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी प्रत्येकी एक स्थानक शोधण्यात यावे, असा आदेश मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी दिला आहे. 8 मार्चपासून डेक्कन व कोयना एक्‍स्प्रेसमध्ये नियमित महिला तिकीट तपासनीस कार्यरत असतील.  

जागतिक महिला दिनी मध्य रेल्वेने 'डेक्कन क्वीन'मध्ये संपूर्ण महिला कर्मचारी नेमण्याचे नियोजन केले आहे. ही गाडी लोको पायलट सुरेखा यादव या चालवणार असून त्यात सहायक तृष्णा जोशी, गार्ड श्‍वेता गोहन, एसी मॅकेनिक महिला असेल. हा उपक्रम म्हणजे मध्य रेल्वेने महिलांच्या सक्षमीकरणाचा केलेला प्रयत्न आहे, असे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के जैन यांनी म्हटले आहे. 

अत्याधुनिक सुविधा 
सीएसएमटी स्थानकात 8 मार्चला हेल्प डेस्क उभारण्यात येईल. या हेल्प डेस्कवर महिला प्रवाशांना तक्रार, सूचना व प्रशंसा नोंदवता येणार आहे. मध्य रेल्वेच्या ज्या विभागात महिला कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे, त्या विभागात महिलांना विश्रांतिगृह, चेंजिग रूम, शौचालय आदी अत्याधुनिक सुविधा देण्याचा मध्य रेल्वे प्रयत्न करणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथील कॅरेज वॅगन डेपोत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांसाठी असलेली चेंजिग रूम अद्ययावत करण्यात येईल, तसेच वॉटर फ्युरिफायर, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीनची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. 

अजनी दुसरे महिला स्थानक 
नागपूरपासून तीन किमी अंतरावरील अजनी स्थानक 8 मार्चपासून संपूर्ण महिला कर्मचाऱ्यांद्वारे चालवण्यात येईल. 1 स्टेशन मास्तर, 6 कर्मशियल क्‍लर्क, 2 टीसी, 4 एलटीटी, 4 सफाई कर्मचारी असे एकूण 19 महिला कर्मचारी या स्थानकात कार्यरत असतील. नागपूर विभागातील गाडी क्रमांक 22112 नागपुर- भुसावळ एक्‍सप्रेस महिला चालवणार आहे. नागपूर, पुणे, भुसावळ, सोलापूर या विभागांतील एका स्थानकात लवकरच संपूर्णतः महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल. 

 

Web Title: marathi news mumbai women day special railway women worker