सर्व महापालिकांमध्ये मालमत्ताकर माफ करा - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

मुंबई - मुंबईतील 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ताकर माफ करण्याची घोषण केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत राज्यातील सर्वच महापालिकांमधील 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ताकर माफ करावा, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबईतील मालमत्ताकर माफीचे श्रेय भाजप घेत असल्याचे पाहून ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना गुगली टाकली आहे.

मुंबईतील 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ताकरमाफीचा शिवसेनेचा प्रस्ताव प्रलंबित असतानाच विधिमंडळात बुधवारी भाजपच्या मागणीनुसार 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ताकर माफ करण्याची अनुकूलता मुख्यमंत्र्यांनी दाखवली. त्यावरून शिवसेना भाजपने श्रेयवाद सुरू केला होता. मालमत्ताकरमाफीचे श्रेय भाजपला जाणार असल्याने ठाकरे स्वत: मैदानात उतरले. मुंबईप्रमाणेच राज्यातील सर्व महापालिकांना मालमत्ताकर माफ करावा, अशी मागणी ठाकरे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.

भाजपच्या कोंडीचा प्रयत्न
मुंबईत 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ताकर माफ करण्याची तयारी दाखवून भाजपने शिवसेनेला दणका दिला होता. ही करमाफी झाली असती तर त्याचे संपूर्ण श्रेय भाजपला मिळाले असते. मात्र आता ठाकरे यांनी स्वत: मैदानात उतरून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: marathi news municipal property tax uddhav thackeray