पालिका शाळांवर वॉच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

नवी मुंबई - महापालिका शाळांच्या इमारतींवर लवकरच तिसऱ्या डोळ्यातून नजर ठेवली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या 42 शाळांच्या इमारतींवर 687 सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने अर्थसंकल्पात चार कोटींची तरतूद केली आहे. 

नवी मुंबई - महापालिका शाळांच्या इमारतींवर लवकरच तिसऱ्या डोळ्यातून नजर ठेवली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या 42 शाळांच्या इमारतींवर 687 सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने अर्थसंकल्पात चार कोटींची तरतूद केली आहे. 

पालिका व सरकारी शाळांचा शैक्षणिक दर्जा एकीकडे घसरत असताना आणि पटसंख्येअभावी अनेक शाळा बंद कराव्या लागत असताना नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमधील पटसंख्या वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यात पालिकेच्या 42 शाळांच्या इमारतींमध्ये 687 सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यातील 195 कॅमेरे हायडेफिनेशनचे असतील. या कॅमेऱ्यांचा मध्यवर्ती कक्ष महापालिका मुख्यालयात असण्याची शक्‍यता आहे. शाळेच्या वर्गांसह, कॉरीडोअर, मैदान, अंतर्गत बगिचे, शिक्षकांचा स्टाफ रूम अशा सर्व ठिकाणी सीसी टीव्हीची नजर असणार आहे. शाळांमध्ये सीसी टीव्ही नसल्यामुळे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. यामुळे वाशीतील शाळेतून काही विद्यार्थी शिक्षकांच्या सांगण्यावरून बाहेर गेले असता अपघात झाल्याची घटना घडली होती. शाळेत कोणत्या वेळी कोण येतो? शिक्षक व मुख्याध्यापक कोणत्या वेळेत शाळेत येतात व कोणत्या वेळी घरी जातात. यावर लक्ष ठेवणेही यामुळे शक्‍य होणार आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमुळे अशा घटनांवर आळा बसवण्यास शिक्षण विभागाला मदत होणार आहे. सध्या महापालिकेच्या दोन शाळांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र त्यांची क्षमता जास्त नसल्याने ते फक्त शोभेचे ठरत आहेत. परंतु आता नवीन सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी चार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून तो तपासणीसाठी अभियांत्रिक विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्यानंतर तो महासभेत मंजुरीसाठी ठेवला जाईल. 

महापालिकेच्या शाळांमध्ये सीसी टीव्ही नसल्यामुळे सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये आता सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. निविदेप्रक्रियेनंतर सीसी टीव्ही बसवण्याच्या कामाला सुरुवात होईल. 
- संदीप संगवे, शिक्षण अधिकारी, महापालिका 

Web Title: marathi news municipal school cctv camera mumbai